भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावपारोळा

सुरक्षा रक्षकाच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच; जि.प. कर्मचारी व खासगी इसम जळगाव एसीबीच्या जाळ्यात

जळगाव,मंडे टु मंडे न्युज | जिल्हा परिषद, धुळे येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तक्रारदाराच्या सेवेसंदर्भातील कामासाठी तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन जणांना रंगेहात पकडले. ही कारवाई १२ ऑगस्ट २०२६ रोजी पारोळा शहरातील हॉटेल ग्रीन पार्क येथे करण्यात आली.

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार हा २८ वर्षीय खासगी सुरक्षा रक्षक असून तो गेल्या १४ महिन्यांपासून तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद, धुळे येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. शासनाच्या नियमानुसार खासगी सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून सलग ६० दिवस काम केल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्याची प्रक्रिया आहे.


या प्रक्रियेसाठी तक्रारदारासह अन्य चार सुरक्षा रक्षकांची नोंदणी करून देण्यासाठी आरोपी आलसे पुरुषोत्तम मंगाजी वाघ (वय ४०), फिटर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद धुळे आणि खासगी इसम बारकू काळू पाटील (वय ६०), सिक्युरिटी एजन्सी व्यवसाय यांनी प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपये, अशा एकूण ७ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने यापूर्वी १ लाख रुपये दिले होते. मात्र त्याचे काम न झाल्याने त्याने एसीबीकडे तक्रार केली.

तक्रारीच्या अनुषंगाने ११ व १२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद, धुळे येथे पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपींनी तक्रारदाराकडील इतर चार सुरक्षा रक्षकांची नोंदणी करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
पडताळणीदरम्यान तडजोड होऊन उर्वरित लाचेची रक्कम ४ लाख ८० हजार रुपये ठरली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. पारोळा येथील हॉटेल ग्रीन पार्क येथे खासगी इसम बारकू पाटील यांनी ४ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत संबंधित शासकीय कर्मचारी आलसे पुरुषोत्तम मंगाजी वाघ यांचाही सहभाग असल्याचे एसीबीच्या पडताळणीत समोर आले आहे.

या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७, ७-अ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही आरोपी एसीबीच्या ताब्यात असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव परिक्षेत्राचे पोलीस अधिकारी व पथकाने केली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, तर पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी काम पाहिले.
नागरिकांना आवाहन : शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!