भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

सावकारीच्या तगाद्याला कंटाळून ४८ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सावदा. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील रोझोदा येथे सावकारीच्या पैशांसाठी होत असलेल्या कथित तगाद्याला आणि मानसिक त्रासाला कंटाळून ४८ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यशवंत भानुदास ठाकुर यांनी ११ ऑगस्ट रोजी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता दुष्यंत ठाकुर आणि त्यांची आई बेकरी बंद करून घरी परतले. त्यावेळी यशवंत ठाकुर हे घरातील स्वयंपाकघरात गंभीर अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांना एक चिठ्ठी आढळली. त्यामध्ये आर्थिक अडचणी, कर्जाचे व्याज आणि संबंधितांकडून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीच्या माहितीनुसार, रोझोदा येथील राहूल नामदेव लिधुरे यांच्याकडून यशवंत ठाकुर यांनी २ लाख रुपये, तर फैजपूर येथील धर्मेंद्र तलरेजा यांच्याकडून ६ लाख रुपये घेतल्याचे नमूद आहे. या कर्जापोटी अनुक्रमे ४ लाख ५० हजार आणि ९ लाख रुपये व्याज दिल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, रक्कम आणि व्याज अदा केल्यानंतरही आणखी व्याजासाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच बेकरीमध्ये ग्राहकांसमोर पैशांची मागणी करताना जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केला जात असल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे यशवंत ठाकुर मानसिक तणावात असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितल्याचेही तक्रारीत नमूद आहे.


या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एसीपी नंदराज दिनकरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चिठ्ठीतील मजकूर, कर्जाचे व्यवहार, व्याजाच्या रकमेसह मानसिक त्रास आणि अपमानाच्या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!