१०० रुपयांची लाच : शासनाच्या योजने अंतर्गत आवश्यक संच व सुरक्षा संच वाटप कर्मचारी जळगाव एसीबी च्या ताब्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र शासन कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या शासनाच्या योजनेअतंर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप करणाऱ्या कर्मचारी भाग्यश्री विजय पाटील वय २० वर्ष रा. सामनेर ता.पाचोरा जि. जळगांव (खाजगी व्यक्ती) याना १०० रुपयांची लाच घेताना जळगाव लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून त्यांच्यावर जळगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सविस्तर माहिती अशी की, मूळ तक्रारदार हे जळगांव येथील रहिवासी असून त्यांनी महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ येथे शासनाच्या योजनेअंतर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळणे करिता दिनांक ०३/०६/२०२६ रोजी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यानुसार दि. ०४/०६/२०२६ रोजी अत्यावश्यक संच व सुरक्षा संच ताब्यात घेण्यासाठी वावडदा ता.जि. जळगाव या ठिकाणी हजर राहणे बाबत पत्र प्राप्त झाले होते त्याप्रमाणे तक्रारदार हे अत्यावश्यक संच व सुरक्षा संच ताब्यात घेणेकामी गेले असता सदर संच वाटप केंद्रावरील भाग्यश्री विजय पाटील यांची भेट घेतली असता त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना सांगितले की अत्यावश्यक संच व सुरक्षा संच ताब्यात घेण्यासाठी तुमची केवायसी करीता आवश्यक दोन फॉर्मस विकत घ्यावे लागतील व त्यासाठी १०० रू लागतील असे सांगुन तक्रारदार यांच्याकडे १०० रुपये लाचेची मागणी केली होती.
तथापी तक्रारदार यांच्याकडे प्राप्त असलेल्या अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळण्याच्या अर्जावरील मुद्दा क्रमांक ३ मध्ये अत्यावश्यक संच व सुरक्षा संच शासनाकडुन लाभार्थी यांना विनामुल्य देण्यात येत असुन त्यासाठी कोणाकडुनही पैशांची अथवा लाचेची मागणी झाल्यास ला.प्र.वि. कार्यालयात संपर्क साधावा असे स्पष्ट नमुद आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरप्रकरणी आरोपी महिला भाग्यश्री विजय पाटील यांचेविरुद्ध दि.०४.०६.२०२६ रोजी ला.प्र.वि. जळगाव यांच्याकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तकारीच्या अनुषंगाने आज दि.०४/०६/२०२६ रोजी लाच मागणी पडताळणी केली असता महिला आरोपी भाग्यश्री विजय पाटील (खाजगी व्यक्ती) यांनी तक्रारदार यांचे अत्यावश्यक संच व सुरक्षा संच ताब्यात देण्यासाठी केवायसी करीता आवश्यक नसतांना दोन फॉर्मस् विकत देण्याचे मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष १००/- रूपये लाच मागणी करून ती स्विकारण्यास संमती दर्शविली होती.
यशस्वी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार वावडदा ता.जि. जळगांव येथील अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप होत असलेल्या ठिकाणी गेले असता महिला आरोपी भाग्यश्री विजय पाटील (खाजगी व्यक्ती) यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम तकारदार यांचेकडुन १००/- रूपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वतः स्विकारली, म्हणुन अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप करणाऱ्या कर्मचारी भाग्यश्री विजय पाटील वय २० वर्ष रा. सामनेर ता. पाचोरा जि. जळगांव (खाजगी व्यक्ती) यांचेविरूध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.
घटनास्थळावरून १३,६७०/- रूपये रोख रक्कम त्यात ५००,२००, १००,५०,२०,१० रुपये दराच्या नोटा मिळून आल्या आहेत. (लाभार्थी यांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच ताब्यात देण्यासाठी त्यांची के वाय सी करण्याचे मोबदल्यात लाभार्थीकडून स्वीकारलेली रक्कम) तसेच सदर घटनास्थळावर असलेल्या झेरॉक्स मशीनजवळील स्टीलच्या डब्यामध्ये १३,१००/- रू रोख रक्कम त्यात ५००,२००, १००,५०,२० रुपये दराच्या नोटा मिळून आल्या असे एकुण २६,७७०/- रू मिळुन आले आहे
सदर कारवाई पर्यवेक्षण व सापळा अधिकारी श्री हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. सापळा पथक पो.नि. रेश्मा अवतारे, ला.प्र.वि. नंदुरबार, कॅम्प जळगांव, श्रेणी पोउप निरी/सुरेश पाटील, पोहेका/बाळु मराठे, पोकों/राकेश दुसाने, दोन्ही नेम. ला.प्र.वि., जळगांव यांनी केली असून प्रकरणाच्या तपासी अधिकारी – श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.जळगांव या आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
