भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

अनुलोम संस्थे अंतर्गत खानापूर येथे विद्यार्थिनींसाठी महिला आरोग्य मार्गदर्शन संवाद कार्यशाळा उत्साहात

खानापूर, मंडेटू मंडे न्युज नेटवर्क : श्री शिवाजी हायस्कूल, खानापूर येथे अनुलोम सामाजिक संस्थेच्या सहयोगाने विद्यार्थिनींसाठी महिला आरोग्य व मार्गदर्शन संवाद कार्यशाळेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळवून देणे तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. बी. इंगळे सर होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून माऊली हॉस्पिटल, रावेरच्या संचालिका डॉ. योगिता संदीप पाटील उपस्थित होत्या. यावेळी अनुलोम सामाजिक संस्थेचे भाग जनसेवक श्री. खेमचंद धांडे तसेच शाळेचे चेअरमन श्री. संजय बोंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गणेशपूजन व सरस्वती मातेला पुष्पार्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यशाळेला विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी डॉ. योगिता पाटील यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत किशोरवयीन मुलींचे आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार, मानसिक आरोग्य, आत्मविश्वास, बदलत्या शारीरिक स्थितींकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि निरोगी जीवनशैली यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिकेने केले. संपूर्ण कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत योग्य माहिती, जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अशा संवादात्मक उपक्रमांची गरज आहे, असा सूर यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले. विद्यार्थिनींच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा उपयुक्त व मार्गदर्शनपर कार्यशाळांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!