भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई, कपार्टमेंटला पडदे, मुला – मुलींना बसण्यासाठी स्पेशल खास व्यवस्था

जळगाव.मंडे टु मंडे न्युज || जळगाव शहरातील एम.जे. कॉलेज परिसरातील गजानन चेंबरमधील ‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाने ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी कारवाई केली. कॉफी शॉपच्या नावाखाली दुकानात प्लायवुड, बोर्ड व पार्टिकलच्या साहाय्याने स्वतंत्र कपार्टमेंट तयार करून त्यांना पडदे लावण्यात आल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी शाळा-महाविद्यालयातील मुला-मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी कॅफेचालक विजय राजेंद्र पाटील (वय २९, रा. इंद्रानगर, खेडी, जि. जळगाव) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम १२९ व १३१(३) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी सुनिता तुकाराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एम.जे. कॉलेज परिसरातील ‘हेवन कॅफे’बाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. कॅफेच्या आत लाकडी कपार्टमेंट तयार करून त्यांना पडदे लावण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत तेथे पाहणी केली.

पोलिसांच्या पाहणीत कॅफेमध्ये विविध साहित्याच्या साहाय्याने कपार्टमेंट तयार केल्याचे आणि त्यांना पडदे लावल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या ठिकाणी काही जण आक्षेपार्ह वर्तन करताना आढळल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.

चौकशीदरम्यान कॅफेचालकाचे नाव विजय पाटील असल्याचे समोर आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कॅफेमध्ये कॉफी शॉपचा परवाना असल्याचे कोणतेही कागदपत्र आढळले नाही. तसेच कॉफी तयार करण्यासाठी आवश्यक कॉफी पावडर, साखर, गॅस किंवा अन्य साहित्यही उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

कॅफेच्या बाहेर ‘कॉफी शॉप’ असा फलक लावण्यात आला होता; मात्र आत खाद्यपदार्थ अथवा कॉफी विक्रीची व्यवस्था नसून कपार्टमेंट व पडद्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ही कारवाई ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४.१० वाजता करण्यात आली. या घटनेनंतर महाविद्यालय परिसरातील कॅफे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला असून, अशा ठिकाणी नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!