Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनशिराबादयावल

यावल पोलिसांची कारवाई :गोवंश कत्तल प्रकरणातील चौघांविरुद्ध ‘संघटित गुन्हेगारी’चे कलम १११ वाढीव, ६५ किलो गोमांस व कत्तलीचे साहित्य जप्त

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | दि. १० : यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डांगपुरा परिसरात गोवंश कत्तलीसंदर्भात दाखल गुन्ह्यातील चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १११ (संघटित गुन्हेगारी) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. यावल पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून ६५ किलो वजनाचे गोमांस तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी कुऱ्हाड, कोयता, सुरा, लाकडी कुंदा, वजनकाटा, वजनमापे व काळ्या रंगाच्या पॉलिथिनच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.

दिनांक ०६ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी पोलीस व होमगार्ड पथकासह पहाटे सुमारे ६ वाजता यावल शहरातील डांगपुरा भागात मंयारवाडा येथे राहणाऱ्या सय्यद रशीद निसार कुरेशी (वय ४५) यांच्या राहत्या घरी छापा टाकला.

या कारवाईत सय्यद रशीद निसार कुरेशी, सय्यद आसिफ सय्यद निसार (वय ३३), सय्यद हफीज सय्यद निसार कुरेशी (वय ३५) आणि सय्यद अन्सार सय्यद निसार (वय ५०) हे चार आरोपी आढळून आले. घराच्या तळघरात गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आढळून आले. यावेळी ६५ किलो गोमांस व कत्तलीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले. तसेच कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या २ जिवंत गायी व २ जिवंत गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून, ३ म्हैसवर्गीय जनावरांचीही सुटका करून त्यांना पुढील संगोपनासाठी गोशाळेत दाखल करण्यात आले.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१२/२०२६ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सन २०१५ च्या सुधारणेसह) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चौघा आरोपींना ०८ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली. त्यांना ०९ ऑगस्ट रोजी यावल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पूर्वीच्या गुन्ह्यांमुळे कलम १११ ची वाढ

गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपी क्रमांक २ सय्यद रशीद निसार कुरेशी याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात सन २०२५ मध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गोमांस विक्रीसंदर्भात गुन्हा दाखल आहे.तसेच आरोपी क्रमांक २ व ३ यांनी संगनमत करून २८ मे २०२६ रोजी बकरी ईदच्या दिवशी त्यांच्या राहत्या घराच्या तळघरात एकूण ८ गोवंश जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणीही यावल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणे न्यायप्रविष्ट असतानाही आरोपींनी अवघ्या दीड महिन्यात पुन्हा एकाच घटनास्थळी अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले. आरोपी क्रमांक २ सय्यद रशीद निसार कुरेशी याने त्याच्या साथीदारांसह संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या वारंवार प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम १११ हे संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

संघटित गुन्हेगारीच्या तरतुदीनुसार या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गवित व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रंगनाथ धारबळे तसेच पोलीस कर्मचारी व बंदोबस्तासाठी तैनात होमगार्ड यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!