आरटीओ पासिंगसाठी ७ हजारांची लाच घेताना एजंट जळगाव एसीबी च्या जाळ्यात
जळगाव.मंडे टु मंडे न्युज | कारच्या कायमस्वरूपी पासिंगसाठी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावाने लाचेची मागणी करून ती स्वीकारताना खासगी एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील इच्छादेवी चौक परिसरात करण्यात आली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे ४४ वर्षीय खासगी वकील असून ते दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. त्यांनी खान्देश मोटर्स शोरूममधून अल्टो के-१० कार खरेदी केली होती. या वाहनाची आरटीओ कार्यालयात तात्पुरती नोंदणी करून घेण्यात आली होती.
कारचे कायमस्वरूपी पासिंग करण्यासाठी तक्रारदार दि. १२ ऑगस्ट रोजी आरटीओ कार्यालयात गेले असता आरोपी एजंट योगेश रामभाऊ पाटील (वय ३२), रा. आदर्शनगर, जुना आरटीओ परिसर, जळगाव, याने आरटीओ कार्यालयातील साहेब व संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्यांच्या नावाने लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तडजोडीअंती ६ हजार ५०० रुपये देण्याचे ठरल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारदाराने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने पडताळणी केली. त्यानंतर सोमवारी इच्छादेवी चौकातील बजाज टी.एल.एस. शोरूम येथे सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी योगेश पाटील याने ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्वीकारली, अशी माहिती एसीबीच्या पत्रकात देण्यात आली आहे.
लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने योगेश रामभाऊ पाटील, वय-३९ वर्ष, व्यवसाय- एजन्ट, खान्देश मोटर्स शोरूम, जळगाव, रा. ९, आदर्शनगर, जुन्या आर.टी.ओ. शेजारी, जळगाव, (खाजगी इसम) या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, कलम ७ अन्वये एमआयडीसी पोलीस ठाणे, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने केली. पथकात पोलीस कर्मचारी हेमंत नागरे, श्रेणी पोलीस निरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हवालदार सुनील वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांचा समावेश होता.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

