भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अमळनेरक्राईम

अवैध वाळू उपशाप्रकरणी अमळनेर तहसीलदार निलंबित; नेमक काय आहे कारण?

जळगाव. मंडे टु मंडे न्युज | अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील वाळू घाटावर नियमांचे उल्लंघन करून मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर महसूल प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणी अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाचे आदेश गुरुवारी दुपारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले.


सावखेडा वाळू घाटावर २६ मे रोजी मशीनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे महसूल आणि पोलिसांच्या कारवाईत उघड झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सावखेडा मंडळाधिकारी कल्याणी पाटील आणि तलाठी पवनकुमार शिंगारे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली होती.


यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्यावर सोपविण्यात आली. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अमळनेर तसेच चोपडा तहसीलदारांबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविला होता.
तहसीलदारांवरील कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मे महिन्यातच शासनाकडे पाठविल्याची माहिती आहे. मात्र, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमामुळे शासनस्तरावरील कारवाईला काहीसा विलंब झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


चोपडा तहसीलदारांवरही कारवाईची शक्यता
अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावर शासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
सावखेडा वाळू उपसा प्रकरणात आणखी कोणावर जबाबदारी निश्चित केली जाते आणि पुढील काळात कोणती कारवाई होते, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!