ओरडणाऱ्या मुलांना शांत राहण्यास सांगितल्याचा राग : लोखंडी कड्याने डोक्यात वार, फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज |घरासमोर खेळणाऱ्या मुलांना शांत राहण्यास सांगितल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीवर लोखंडी कड्याने हल्ला करून मारहाण केल्याची घटना यावल तालुक्यातील पाडळसा येथे घडली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी जीवन दिलीप पाटील (वय ३६, रा. हाऊसिंग सोसायटी, मारोती मंदिराजवळ, पाडळसा, ता. यावल) यांनी घरासमोर मोठ्याने आरडाओरडा करणाऱ्या मुलांना शांत राहण्यास सांगितले. याचा राग आल्याने भावेश सतीश चौधरी आणि भूषण योगेश चौधरी (दोघे रा. हाऊसिंग सोसायटी, पाडळसा) यांनी फिर्यादीशी वाद घालत मारहाण केली. मारहाणीत भावेश चौधरी याने हातातील लोखंडी कड्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून दुखापत केली, तर भूषण चौधरी याने चापट-बुक्क्यांनी मारहाण केली.
या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक १६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी मोती पराग पवार करीत आहेत.


