प्रेमसंबंधाचा राग अनावर : दोघांना कारने चिरडून ठार मारण्याचा असफल प्रयत्न, रावेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | प्रेमसंबंधाच्या वादातून राग अनावर झाल्याचे काटा काढण्याच्या उद्देशाने
रावेर तालुक्यातील उदळी बुद्रुक शिवारात नदीच्या रस्त्याजवळ कारने २ तरुणांना चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न असफल झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
रावेर तालुक्यातील उदळी बुद्रुक येथील गौरव सुरेश पाटील (वय २०) आणि त्याचा भाऊ कुणाल सुरेश पाटील यांपैकी कुणाल पाटील याचे संशयित आरोपी गोपी उर्फ सुशील सुभाष पाटील (रा. उदळी बुद्रुक ता. रावेर) यांच्या पुतणीसोबत प्रेमसंबंध होते. याचा संशयित आरोपी गोपी उर्फ सुशील पाटील याला अनेक दिवसांपासून मनात राग होता. मंगळवारी दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गौरव पाटील व कुणाल पाटील हे भाऊ दुचाकी (क्रमांक एमएच १९ डीसी ४१९१) वरून शेतात फवारणीसाठी फवारणीचा पंप घेऊन निघाले होते.
उदळी गावातून नदीच्या रस्त्याने शेताकडे जात असताना गोपी उर्फ सुशील पाटील याने त्याची कार भरधाव वेगाने चालवत गौरव पाटील व कुणाल पाटील यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने समोरून धडक देऊन जखमी केले. तसेच पुन्हा जोरात कार रिव्हर्स आणून दोघांना ठार मारण्याच्या उद्देशाने चिरडण्याचा प्रयत्न केला. यात दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. दोघे जखमींना तात्काळ फैजपूर येथील डॉ. खाचणे यांच्या आशिर्वाद रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गौरव पाटील यांचा उजवा हात मोडला आहे. दोघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला गौरव सुरेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोपी उर्फ सुशील सुभाष पाटील याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ सप्टेबर पर्यंत कोठडी देण्यात आली आहे
पुढील तपास सपोनि विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल सानप हे तपास करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

