अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अंकुश चौधरी यांची निवड
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने संघटनेच्या बांधणीला गती देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असुन संघटनेच्या विस्तार आणि बळकटीकरणासाठी
जळगाव जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली असुन मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील सक्रिय तरुण कार्यकर्ते श्री. अंकुश राजेंद्र चौधरी (गुर्जर) यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नितीन चौधरी (गुर्जर) यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली असून, अंकुश चौधरी यांच्याकडे जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा ही संपूर्ण देशात गुर्जर समाजाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक उत्थानासाठी कार्य करणारी एक मोठी संघटना आहे. महाराष्ट्रातही या संघटनेचा विस्तार वेगाने होत आहे. जळगाव जिल्ह्यासारख्या महत्त्वपूर्ण ठिकाणी अंकुश चौधरी यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाकडे धुरा सोपवून संघटनेने युवकांना प्राधान्य दिले आहे.
अंकुश चौधरी हे चांगदेव येथिल रहिवासी असुन त्यांचा परिवार सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. अंकुश चौधरी हे बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदावर कार्यरत असुन चांगदेव येथिल. श्री एस.बी. चौधरी हायस्कूल या शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
अंकुश चौधरी यांची ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. या काळात महासभेच्या नियमांचे पालन करून संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. यात प्रामुख्याने संपूर्ण जिल्ह्यात महासभेचे विचार पोहोचवून मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी अभियान राबवणे. प्रतिवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला गुर्जर प्रतिहार सम्राट मिहीर भोज यांची जयंती ‘आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करणे. जिल्ह्यातील गुर्जर समाजाला एका व्यासपीठावर आणून संघटनेची मजबूत बांधणी करणे.
अशा जबाबदाऱ्या अंकुश चौधरी यांना पार पाडवयाच्या आहेत.
आपल्या निवडीबद्दल बोलताना अंकुश चौधरी यांनी सांगितले की, “दिलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन आणि समाजाच्या विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून सदैव तत्पर राहीन.” अंकुश चौधरी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यातील गुर्जर समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. समाजातील ज्येष्ठ मंडळी, तरुण कार्यकर्ते आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
