अण्णा भाऊ साठे यांचे समाज प्रबोधनासाठी मोठे योगदान : प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने
ऐनपूर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे विद्यार्थी विकास विभाग व समान संधी केंद्राच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य श्री दिनेश चव्हाण उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. एस. पी. उमारीवाड आणि डॉ. एम. के. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे श्री दिनेश चव्हाण यांनी ‘माय भारत’ पोर्टलवरील नशामुक्ती अभियानाची माहिती देत युवकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.
प्रा. डॉ. एस. पी. उमारीवाड यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली. डॉ. एम. के. सोनवणे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर प्रकाश टाकत त्यांच्या साहित्याने व सामाजिक कार्याने वंचित समाजाला नवी दिशा दिल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या बालपणापासून ते साहित्यिक आणि समाजप्रबोधक म्हणून झालेल्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांच्या साहित्यकृतींतील सामाजिक संदेशांची उदाहरणांसह मांडणी करत समाजप्रबोधनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रप्रेम, शिक्षण, स्वराज्य आणि समाजजागृतीसाठीच्या कार्याचेही त्यांनी स्मरण केले.
यानंतर महाविद्यालयीन ग्रंथालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींचे पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाची माहिती ग्रंथपाल डॉ. एस. एस. साळुंखे यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत बाविस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एम. के. सोनवणे यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव, डॉ. पी. आर. महाजन, प्रा. एस. आर. इंगळे, डॉ. जे. पी. नेहेते, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. एस. ए. पाटील, डॉ. पी. आर. गवळी, डॉ. रामटेक, डॉ. एन. यू. बारी, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. अक्षय महाजन, प्रा. एस. बी. महाजन यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री हर्षल पाटील, श्री श्रेयस पाटील आणि अनुराग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

