भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावशैक्षणिक

बोगस शालार्थ आयडी : वैयक्तिक मान्यतेच्या फाइल्स तत्काळ सादर करा, शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

एसआयटी चौकशी साठी मागविल्या ‘ओसी’; मुदत संपूनही अनेक शाळांकडून फाइल्स सादर नाहीत

जळगाव.मंडे टु मंडे न्युज ||बोगस शालार्थ आयडी प्रकरणाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतांचीही एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रस्तावांच्या ‘ओसी’ प्रतींच्या फाइल्स शिक्षण विभागाने शाळांकडून मागविल्या आहेत. मात्र, सूचना देऊनही अनेक शाळांनी अद्याप या फाइल्स सादर केलेल्या नाहीत.

फाइल्स सादर करण्यास होत असलेल्या दिरंगाईची दखल घेत जळगाव  जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना सोमवार, २१ सप्टेंबरपर्यंत वैयक्तिक मान्यतेच्या फाइल्स सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही मुदत संपूनही अनेक शाळांकडून फाइल्स जमा करण्यात आलेल्या नसल्याचे समोर आले आहे.

एसआयटीकडून कागदपत्रांची पडताळणी
बोगस शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीकडून विविध कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेच्या ‘ओसी’ प्रती मागविण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांच्या आधारे संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, त्यांना देण्यात आलेली वैयक्तिक मान्यता आणि त्यानंतर शालार्थ प्रणालीमध्ये करण्यात आलेली नोंद यांची पडताळणी केली जाणार आहे.

या कागदपत्रांच्या तपासणीतून बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून वैयक्तिक मान्यतेच्या फाइल्स सादर करण्याबाबत संबंधित शाळांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

वैयक्तिक मान्यतेची ‘ओसी’ का महत्त्वाची?
अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेत शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर ती नियुक्ती शासनाच्या नियमानुसार झाली आहे का, याची तपासणी शिक्षण विभागाकडून केली जाते. नियुक्तीशी संबंधित कागदपत्रे व प्रक्रिया नियमांनुसार असल्याचे आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यास शिक्षण विभागाकडून वैयक्तिक मान्यता दिली जाते.

ही मान्यता संबंधित कर्मचाऱ्याच्या नियुक्तीला मिळालेल्या शासकीय मंजुरीचा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. वैयक्तिक मान्यता मिळाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याची माहिती राज्याच्या ‘शालार्थ’ ऑनलाइन वेतन प्रणालीमध्ये नोंदविली जाते. त्यानंतर कर्मचाऱ्यास स्वतंत्र शालार्थ आयडी दिला जातो.

मान्यता नसेल तर शालार्थ आयडी कसा?
बोगस शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक मान्यतेच्या कागदपत्रांना महत्त्व प्राप्त झाले आहे. संबंधित कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक मान्यतेची ‘ओसी’ उपलब्ध नसेल, तर त्याची नियुक्ती, मान्यता आणि शालार्थ प्रणालीतील नोंद याबाबत पडताळणी होऊ शकते. त्यामुळे वैयक्तिक मान्यतेच्या फाइल्स आणि ‘ओसी’ सादर करण्याच्या शिक्षण विभागाच्या आदेशाकडे आता संबंधित शाळांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!