रावेर तालुका हादरला! भरदिवसा महिलेचा खून, कारण अद्याप अस्पष्ट
रावेर.मंडे टु मंडे न्युज || रावेर तालुक्यातील दोधे या गावी घरात एकट्या असलेल्या ललिताबाई वसंत पाटील या महिलेचा खून झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण आणि घटनाक्रम पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ललिताबाई पाटील या पतीसह दोधे येथे राहत होत्या. गावात भंडाऱ्याचा कार्यक्रम असल्याने गावातील बहुतांश नागरिक तसेच महिला जेवणासाठी कार्यक्रमस्थळी गेले होते. ललिताबाईदेखील भंडाऱ्याचे जेवण करून घरी परतल्या होत्या.
याचदरम्यान त्या घरात एकट्या असल्याची संधी साधून एका इसमाने घरात प्रवेश करून त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याचेही प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे दागिन्यांच्या लुटीच्या उद्देशानेच हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास भोसले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. घटनेशी संबंधित पुरावे आणि माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.
दरम्यान, ललिताबाई वसंत पाटील यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. भरदिवसा घरात एकट्या महिलेचा खून झाल्याने दोधे गावासह संपूर्ण रावेर तालुक्यात या घटनेची चर्चा सुरू आहे. घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

