घरफोडी करणारी टोळी निंभोरा पोलिसांच्या जाळ्यात! तीन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस ; ६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
निंभोरा. ता . रावेर. मंडे टु मंडे न्युज || रावेर तालुक्यातील खिर्डी येथे झालेल्या घरफोड्यांचा तपास लावत निंभोरा पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. मुंबईतून एका आरोपीला, तर खिर्डी येथून चार आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिर्डी येथील शेहनाज शेख अख्तर या कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी १३ ते १४ सप्टेंबरदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ३२ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निंभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी नवाज शेख शरीफ (वय २३) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची माहिती दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत त्याची अधिक चौकशी केली असता त्याने शहादत बेग रफिक बेग, अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख रमजान आणि शाकीब बेग साबीर बेग यांच्या साथीने घरफोडी केल्याची माहिती दिली.
या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक मुंबई येथे रवाना झाले. तेथून शहादत बेग याला, तर खिर्डी येथून अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख आणि शाकीब बेग यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ५ लाख ७९ हजार ३१० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
आणखी दोन घरफोड्यांची कबुली
आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी खिर्डी गावात याच गुन्ह्याव्यतिरिक्त आणखी दोन घरफोड्या केल्याची माहिती दिली. या तपासात चेतन लिलाधर जाधव (वय २९) याचेही नाव निष्पन्न झाले.bया दोन्ही गुन्ह्यांत चोरीस गेलेल्या १ लाख ७७ हजार ४०० रुपयांच्या मुद्देमालापैकी ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत सोन्याच्या बाळ्या, चांदीच्या लक्ष्मी, शारदा, बालगोपाळ व गणेशाच्या मूर्ती तसेच विविध सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. अशाप्रकारे तीन घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये एकूण ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.
या प्रकरणात नवाज शेख शरीफ, अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख रमजान, शहादत बेग रफिक बेग, चेतन लिलाधर जाधव आणि शाकीब बेग साबीर बेग या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून निंभोरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए. एम. ढाकणे, ममता आर. तडवी तसेच पोलीस अंमलदार रिजवान पिंजारी, अविनाश पाटील, सुभाष शिंदे, परेश सोनवणे, किरण जाधव, सर्फराज तडवी आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

