भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यात कांद्याच्या रोपाच्या नुकसानीवरून दोन गटांत हाणामारी; परस्पर गुन्हे दाखल

यावल.मंडे टु मंडे न्युज || यावल तालुक्यातील सावखेडासीम गावातून गायरानकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेतातील कांद्याच्या रोपांचे आयशर ट्रकमुळे नुकसान झाल्याचा जाब विचारण्यावरून दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेत दोन्ही गटातील दोन जण जखमी झाले असून, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींवरून एका गटातील दोन तर दुसऱ्या गटातील चार अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सावखेडासीम गावातून गायरानकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शेत गट क्रमांक १५४ आहे. या शेताला लागून असलेल्या शेतात केळी भरण्यासाठी आलेल्या आयशर ट्रकमुळे कांद्याच्या रोपांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. याबाबत आशाबाई कडू जयकर (रा. दहिगाव) यांनी प्रकाश सुभाष पाटील व विजय विकास पाटील (दोघे रा. सावखेडासीम) यांना जाब विचारला. त्यावरून वाद निर्माण झाला.

या वादातून प्रकाश पाटील व विजय पाटील यांनी आशाबाई जयकर यांना शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण केली. तसेच, “आमच्या नादी लागली तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आशाबाई जयकर यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसांनी प्रकाश पाटील व विजय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या गटाकडून चौघांविरुद्ध गुन्हा

दरम्यान, प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आयशर ट्रकमुळे कांद्याच्या रोपांचे नुकसान झाल्याच्या कारणावरून झालेल्या वादात कडू चिंधु जयकर, पंकज कडू जयकर, परेश मधुकर तायडे व आशाबाई जयकर (सर्व रा. दहिगाव) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केली व ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून चौघांविरुद्धही यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित तडवी करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!