चोपडा हादरले! जन्मदात्या बापाचा दोन अल्पवयीन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर
चोपडा | मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी पहाटे अत्यंत धक्कादायक घटना घडली. जन्मदात्या वडिलांनी झोपेत असलेल्या आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात १३ वर्षीय मीरा सुभाष भिलाला हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा ११ वर्षीय भाऊ रामु सुभाष भिलाला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०) हा घटना घडल्यानंतर जंगलाच्या दिशेने पळून गेला होता. माहिती मिळताच अडावद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम राबवत काही वेळातच आरोपीला ताब्यात घेतले. सध्या त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
प्राथमिक तपासात दोन्ही मुले घरात झोपेत असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या भीषण हल्ल्यात मीराचा जागीच मृत्यू झाला, तर रामु गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती किंवा इतर कोणते कारण या घटनेमागे आहे का, याचा सर्व बाजूंनी तपास अडावद पोलीस करत आहेत.
घटनेनंतर वडती गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुरावे संकलित केले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अमानुष घटनेमुळे चोपडा तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


