मोठा निर्णय : आंतरधर्मीय विवाह झाल्यास अपत्याला आईचा धर्म लागणार, “महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा” लागू
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | महाराष्ट्रात सक्तीने, फसवून, धमकावून किंवा आमिष दाखवून करण्यात येणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मंजूर केलेल्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर हा कायदा राज्यात अधिकृतपणे लागू झाला असून, बेकायदेशीर धर्मांतराविरोधात कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
बळजबरीच्या धर्मांतरावर कठोर शिक्षा
कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीचे बळजबरीने, धमकावून, फसवून किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा अजामीनपात्र गुन्हा मानण्यात आला आहे. दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला ७ वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
स्वेच्छेच्या धर्मांतरासाठी पूर्वसूचना आवश्यक
स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे ६० दिवस आधी लेखी अर्ज सादर करणे आवश्यक असेल. आवश्यक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच धर्मांतराची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
अपत्याला मिळणार आईचा विवाहपूर्वीचा धर्म
आंतरधर्मीय विवाहातील अपत्याच्या धर्माबाबत तरतूद
कायद्यातील एका महत्त्वाच्या तरतुदीनुसार, आंतरधर्मीय विवाह झाल्यास दाम्पत्याच्या अपत्याचा धर्म आईचा विवाहापूर्वीचा धर्म मानला जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यात सक्तीच्या आणि बेकायदेशीर धर्मांतराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा कायदा लागू करण्यात आल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. या कायद्यामुळे धर्मांतरासंदर्भातील प्रक्रिया अधिक नियमनबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


