ब्रेकिंग : बनावट शालार्थ आयडी प्रकरणी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात छापा
जळगाव. मंडे टु मंडे न्युज | राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या १६० कोटींच्या बहुचर्चित बोगस ‘शालार्थ आयडी’ घोटाळा प्रकरणी नाशिक गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथकाने (SIT) जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात मोठे छापे टाकले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बनावट शालार्थ आयडी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व रावेर येथे चौकशी साठी भेट दिल्याची माहिती आहे. मात्र पुढे काय घडले या संदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही.
शिक्षण क्षेत्रातील या मोठ्या घोटाळ्याची व्याप्ती जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे समोर आले असून, या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि दलालांचे धाबे दणाणले आहेत.
१६० कोटींचा अपहार: बनावट कागदपत्रे आणि मागील तारखांचे (backdated) नियुक्ती आदेश तयार करून शासकीय ‘शालार्थ’ प्रणालीवर बोगस आयडी तयार करण्यात आले. याद्वारे शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचे वेतन आणि थकबाकी (Arrears) लाटण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक बोगस शिक्षक: एसआयटीच्या (SIT) तपासात समोर आलेल्या एकूण ८४१ बोगस शिक्षकांपैकी ६०० हून अधिक बोगस शिक्षक आणि कर्मचारी एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यामुळेच गुन्हे शाखेने आपला मोर्चा आता रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चाळीसगाव आणि जामनेर या भागांकडे वळवला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत जळगाव जिल्हा परिषदेचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, मुख्य संशयित प्रशांत वाडिले आणि शिक्षणसम्राट संजय गरुड यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे.
१,२०० संशयित रडारवर: या घोटाळ्यात केवळ शिक्षकच नव्हे, तर शिक्षण विभागाचे उपनिदेशक कार्यालयातील अधिकारी, वेतन अधीक्षक, शिक्षण संस्थाचालक आणि राजकीय नेते अशा सुमारे १,२०० लोकांची चौकशी सुरू आहे.गुन्हे शाखेच्या या धाडींनंतर अनेक संशयित आरोपी आणि शिक्षण संस्थाचालक सध्या ‘नॉट रिचेबल’ किंवा भूमिगत झाले आहेत. पोलीस या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची आणि बनावट कागदपत्रांची कसून चौकशी करत आहेत.
१६० कोटींच्या बोगस ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात एकूण १११ शिक्षण संस्था रडारवर असून, यात जळगाव जिल्ह्यातील ६६ संस्थांचा समावेश आहे. या प्रकरणातील तपासात तीन शाळा पूर्णपणे बोगस असल्याचे उघड झाले असून, मकोका अंतर्गत कठोर कारवाईची तयारी सुरू आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

