रिपोर्टमध्ये घोळ, आरोग्यसेवेच्या नावाखाली रुग्णांच्या जीवाशी खेळ ! रुग्णाच्या आरोग्याशी धोकादायक प्रयोग! सावद्यातील ‘त्या’ पॅथॉलॉजी लॅब वर गंभीर प्रश्नचिन्ह?
सावदा, ता. रावेर मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | सावदा शहरातील एका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या कारभाराबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, चुकीचे वैद्यकीय अहवाल देऊन रुग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. वैद्यकीय निदानातील एका चुकीची किंमत एखाद्या रुग्णाला जीव धोक्यात घालून मोजावी लागू शकते. अशा परिस्थितीत या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे, या प्रकारामुळे रुग्णांच्या आरोग्यासह जीवितालाही धोका निर्माण होत असल्याची गंभीर चर्चा शहरात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका रुग्णाला संबंधित लॅबकडून देण्यात आलेल्या तपासणी अहवालात गंभीर स्वरूपाची वैद्यकीय समस्या असल्याचे नमूद करण्यात आले होते. हा रिपोर्ट पाहून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली. पुढील उपचारासाठी मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेल्यानंतर संबंधित डॉक्टरांना अहवालाबाबत संशय आला. त्यांनी पुन्हा दुसऱ्या नामांकित लॅबमधून तपासणी करण्याचा सल्ला दिला.
डॉक्टरांच्या सूचनेनुसार बाहेरगावी दुसऱ्या लॅबमध्ये तपासणी करण्यात आली. मात्र, नव्याने प्राप्त झालेला अहवाल पहिल्या अहवालापेक्षा पूर्णतः वेगळा निघाला. विशेष म्हणजे दुसऱ्या लॅबचा अहवालच वैद्यकीयदृष्ट्या योग्य असल्याचे स्पष्ट झाल्याने पहिल्या अहवालाच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत संबंधित रुग्णाने सावद्यातील त्या लॅबकडे जाब विचारला असता, सुरुवातीला “प्रिंट मिस्टेक” झाल्याचे कारण देण्यात आले. त्यानंतर तब्बल दोन दिवसांनी सुधारित अहवाल देण्यात आला. मात्र, केवळ “प्रिंट मिस्टेक” म्हणून या गंभीर प्रकाराकडे पाहता येईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
वैद्यकीय तपासणी अहवाल हा उपचाराचा पाया मानला जातो. अशा परिस्थितीत चुकीच्या अहवालाच्या आधारे औषधोपचार सुरू झाले असते तर रुग्णाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकले असते. शिवाय अनावश्यक तपासण्या, औषधे आणि उपचारांमुळे आर्थिक भुर्दंडही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष धक्कादायक बाब म्हणजे संबंधित पॅथॉलॉजीस्ट स्थानिक लॅब मध्ये हजर नसताना ही रिपोर्ट त्यांच्या सहीने दिली जातात. रुग्णांच्या जीवाशी हा मोठा खेळ खेळला जात असून त्याचे लायसन /रजिस्ट्रेशन रद्द करावे.
शहरातील नागरिकांमध्ये आता प्रश्न उपस्थित होत आहे की, संबंधित लॅबमधील तपासणी प्रक्रिया, यंत्रणा आणि गुणवत्ता नियंत्रणाची तपासणी कोण करणार? रुग्णांच्या जीवाशी संबंधित अशा गंभीर बाबींमध्ये केवळ “चूक झाली” असे सांगून जबाबदारी झटकता येईल का?
रुग्णांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या प्रकाराची आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. “रिपोर्टमधील एक चूक केवळ आकड्यांची नसते; ती एखाद्या रुग्णाच्या आयुष्याशी आणि विश्वासाशी जोडलेली असते.”::: क्रमश:
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

