व्यापाऱ्यांकडून १८ हजारांची लूट, यावल पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल शहरातील एका व्यापाऱ्याकडून १८ हजार रुपये लूटण्यात आले होते. या प्रकरणी आसीफ बशीर तडवी (बोरावल गेट) याचे सह त्याचे दोघे साथीदार यांच्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
यावल शहरातील प्रमोद जगन्नाथ बुरुजवाले हे छोट्या दुकानदारांना विक्री केलेल्या गोळ्या बिस्किटांचे मालाची पैशांची वसुली करून जात असताना त्यांच्या जवळ त्यांच्या ओळखीचा असलेला आरोपी आसीफ बशीर तडवी हा त्याचे इतर दोघे साथीदारांसोबत आला व त्याने व्यापाऱ्याची कॉलर पकडून त्याच्याकडे पैशांची बळजबरीने मागणी केली तसेच शिवीगाळ दमदाटी करून त्यांच्या खिशातील १८ हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून पोबारा केला होता.
या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात प्रमोद जगन्नाथ बुरूजवाले यांच्या तक्रारीनुसार आसीफ बशीर तडवी याचे सह त्याचे दोघे साथीदार अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

