नशिराबाद आठवडे बाजारातील पावती विना वसुली प्रकरणाची चौकशीची मागणी, मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करा..
भूषण कोल्हे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज.डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद नगरपरिषद हद्दीतील आठवडे बाजारात व्यापारी व विक्रेत्यांकडून विविध प्रकारचे शुल्क, जागाभाडे व बाजार वसुली करताना अधिकृत पावती न देता रक्कम वसूल केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे आर्थिक अनियमितता, महसूल अपहार व भ्रष्टाचाराची शक्यता निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला असून संबंधित कर्मचाऱ्यांवर तसेच मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका शाखेतील सहाय्यक आयुक्त यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. यापूर्वी २७ एप्रिल २०२६ रोजी नगरपरिषदेला अर्ज देण्यात आला होता, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, आठवडे बाजारातील वसुली करताना व्यापारी व विक्रेत्यांना अधिकृत नगरपरिषद पावती, मशीन पावती किंवा साधी पावतीदेखील दिली जात नसल्याने महसूल व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित कर्मचारी उघडपणे पावतीविना वसुली करत असतानाही मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ७७, ७८(क) व ७९ चा उल्लेख करून मुख्याधिकाऱ्यांनी आर्थिक शिस्त व नियंत्रण राखण्याची जबाबदारी पार पाडण्यात कसूर केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनाद्वारे आठवडे बाजारातील वसुलीची स्वतंत्र चौकशी, विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट), वसुली नोंदवही, पावती पुस्तके, जमा रक्कम व बँक नोंदींची तपासणी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आर्थिक नुकसानभरपाई वसूल करणे तसेच भविष्यात सर्व वसुली अधिकृत पावतीद्वारे करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे नशिराबाद नगरपरिषदेतील आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकते बाबत प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

