खासगी वाहनांवर ‘पोलीस’ लिहिणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश ; वाहतूक विभागाचे राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना पत्र
मुंबई. मंडे टु मंडे न्युज | खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांवर लाल रंगात ‘पोलीस’ असे लिहिणे किंवा तशी पाटी लावून वाहनांचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाईचे संकेत मिळाले आहेत. राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने यासंदर्भात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच महामार्ग पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अर्जदार श्री. सखाराम कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हा निर्णय प्रक्रियेत आला आहे. संबंधित तक्रारीत अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल पाटी किंवा लाल अक्षरात ‘पोलीस’ लिहून वाहनांचा वापर करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार अशा वाहनांची तपासणी अनेकदा टाळली जाते. त्यामुळे काही समाजकंटक अशा पाट्यांचा गैरवापर करून अवैध वाहतूक, दहशत निर्माण करणे किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी वाहनांचा वापर करत असल्याची बाबही निदर्शनास आणून देण्यात आली आहे. यापूर्वीही अशा प्रकारांबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करून कारवाईचे निर्देश दिल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी पाटी किंवा लाल अक्षरात ‘पोलीस’ लिहिलेले वाहन आढळल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १३३(६) तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १७७ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली होती.
याबाबतची मूळ तक्रार संबंधित पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांकडे पुढील योग्य कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली असून, राज्यभरात अशा वाहनांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


