असोदा उड्डाणपूलाचे काम अत्यंत निकृष्ठ : गुणवत्तेचा अभाव, कळ्या मातीचा वापर, दोषींवर कठोर कारवाई होणार – मंत्री गिरीश महाजन
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज.डॉ.दीपक लोखंडे | धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद–पाळधी बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या घटनेची सोमवारी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार राजूमामा भोळे ,जिल्हाधिकारी रोहन घुगे,पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,जळगाव महापौर दीपमाला काळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी गिरीश महाजन यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाजन म्हणाले की, धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील हा उड्डाणपूल अत्यंत निकृष्ट दर्जाने बांधण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
महाजन यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (एनएचएआय) दिल्ली येथील तज्ज्ञांची टीम मंगळवारी घटनास्थळी पाहणी करणार आहे. या पथकाच्या अहवालानंतर संबंधित ठेकेदाराविरुद्ध आवश्यक ती प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. काही दिवसांच्या पावसामुळे एवढ्या मोठ्या उड्डाणपुलाचा भराव खचत असेल, तर कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, असेही त्यांनी नमूद केले.
संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्यासह त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही महाजन यांनी केली. “एक ठेकेदार दुसऱ्या ठेकेदाराला आणि तो पुढे तिसऱ्या ठेकेदाराला काम देत असल्याची पद्धत अत्यंत गंभीर असून त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे,” असे ते म्हणाले.
खासदार स्मिता वाघ यांनी या कामाबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी केल्या होत्या. निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची बाब त्यांनी संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून दिली होती. ठेकेदारालाही यासंदर्भात समज देण्यात आली होती; मात्र त्यानंतरही आवश्यक ती दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप महाजन यांनी केला.
पुलाच्या भरावासाठी मुरूमाऐवजी काळ्या मातीचा वापर करण्यात आल्यानेच मोठ्या प्रमाणावर भराव व सुरक्षा काँक्रिट प्लेट खचल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे केवळ तात्पुरती दुरुस्ती करून हा प्रश्न सुटणार नसून संपूर्ण उड्डाणपूल नव्याने उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“जनतेच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित पुलाबाबत कोणताही धोका पत्करला जाणार नाही. तांत्रिक तपासणीनंतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील,” असेही महाजन यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

