भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

१ लाख ९८ हजार लुटून नेल्याचा बनाव, कर्मचारीच निघाला लुटेरा

अवघ्या ४  तासात सावदा पोलिसांनी केली आरोपीला अटक

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील सावदा येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथील सरकारमान्य देशी दारू दुकानातील व्यवसायाची रोकड घेऊन जाणाऱ्या कामगारानेच चोरीचा बनाव रचून तब्बल १  लाख ९८  हजारांची रक्कम अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सावदा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा छडा लावला असून, आरोपीला अटक करून संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र भागवत जयस्वाल (वय ६०, रा. पंचमुखी हनुमान नगर, रावेर) यांचे थोरगव्हाण येथे सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातील कर्मचारी शेख सुफियान शेख अतीक (वय २०, रा. नागझीरी रोड, इमामवाडा, रावेर) हा नेहमीप्रमाणे व्यवसायातून जमा झालेली रोकड रावेर येथे मालकाकडे पोहोचवत असे.

दि. १३  जुलै २०२६  रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता शेख सुफियान याने दुकानातील १,९८,००० इतकी रोकड घेऊन दुचाकीने रावेरकडे प्रस्थान केले. त्यानंतर सावदा-रावेर मार्गावरील राजदीप पेट्रोल पंपाजवळ (वाघोदा बुद्रुक) दोन अज्ञात इसमांनी पल्सर मोटारसायकलवर येऊन त्याच्याकडील पैशांची पिशवी हिसकावून नेल्याची माहिती त्याने मालक व पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप व पथकाने फिर्यादी व कर्मचाऱ्यासह घटनास्थळाची पाहणी केली. तसेच थोरगव्हाण ते राजदीप पेट्रोल पंप या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीवरून सावदा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र, तपासादरम्यान शेख सुफियान याच्या कथनात विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली. चौकशीत त्याने चोरीचा बनाव स्वतःच रचून विश्वासाने दिलेली रोकड स्वतःच लंपास केल्याची कबुली दिली. त्यानुसार गुन्ह्यात बीएनएस कलम 306 ची भर घालण्यात आली. आरोपीला अटक करून त्याच्याकडून १ लाख ९८  हजारांची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोहेका निलेश बाविस्कर, विनोद तडवी, संजीव चौधरी, उमेश पाटील, पोना सुनील सैंदाणे, पोका मयूर पाटील, संजय तडवी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पवार व सहाय्यक फौजदार सुनील दामोदरे यांनी सहभाग घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!