बनावट जात प्रमाणपत्र : महिला सरपंचाला रावेर तहसीलदारांचे खुलासा सदर करण्याचे आदेश
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील कोचुर खुर्द येथील ग्रुप ग्रामपंचायत सरपंच ज्योती संतोष कोळी यांनी अनुसूचित जमातीचा बनावट बोगस जातीचा दाखला निवडणुकीत सादर करून शासनाची फसवणूक करत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. मात्र सौ कोळी यांनी निवडणुकी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर केलेला दाखला बनावट असल्याची तक्रार याच ग्रामपंचायत सदस्यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, सरपंच सौ कोळी यांना २६ जून पर्यंत खुलासा करण्याचे आदेश नोटीस द्वारे रावेर तहसीलदारांनी दिले असून दिलेल्या मुदतीत खुलासा सादर न केल्यास सरपंच ज्योती कोळी यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्या प्रकरणीगुन्हा दाखल होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सौ ज्योती कोळी या “टोकरे कोळी” या अनुसूचित जमाती एसटी जागेवर निवडून आल्या असून कोचुर खुर्द सरपंचपदी विराजमान आहेत. त्यांनी अनुसूचित जमाती एसटी टोकरे कोळी जातीचे बोगस बनावट सही शिक्क्याचे प्रमाणपत्र तयार करून तात्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी रावेर तहसीलदार यांना हे बनावट खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याची तक्रार कोचुर खुर्द ग्रामपंचायत सदस्य कविता पाटील, गणेश महाजन, लिलाबाई तायडे, प्रशांत तायडे या ग्रामपंचायत सदस्यांनी पुराव्यानिशी तहसीलदारांकडे केली आहे.
खोट्या सही शिक्याच्या बनावट टोकरी कोळी जातीच्या प्रमाणपत्राची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी या तक्रारदार सदस्यांनी केली आहे. या अर्जाची तहसीलदार बी ए कापसे यांनी दखल घेतली असून सरपंच ज्योती कोळी यांना लेखी नोटीस बजावली आहे. २६ जून पर्यंत आपल्या विरोधात असलेल्या तक्रारी अर्ज संदर्भात खुलासा सादर करण्यासाठी मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.
या बनावट जातीच्या दाखल्या बाबत संशय बळावत असून कोचुर गावामध्ये मोठ्या प्रमाणात जोरदार चर्चा असून गावकऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.या वर काय कारवाई होते या कडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

