भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ

यावल तालुक्यातील घटना

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या यावल तालुक्यातील मोहराळा गावातील १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह २० जून शुक्रवार रोजी विहिरीत आढळून आला. या घटनेने यावल तालुक्यातील मोहराळा परिसरात खळबळ उडाली.

मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून या पार्श्वभूमीवर संतप्त जमावाने एका चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याने वातावरण अधिकच चिघळले आहे. या मुळे संपूर्ण गावात मोठा तणाव निर्माण झाला.

यावल तालुक्यातील मोहराळा येथील साहिल शब्बीर तडवी. वय १९ वर्ष. हा तरुण १६ जून पासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला होता, मात्र त्याचा थांगपत्ता न लागल्याने यावल पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

अखेर शुक्रवार रोजी मोहराळा गावाजवळील वड्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या शेतातील विहिरीत साहिलचा मृतदेह आढळून आला. साहिल तडवीचा विहिरीत मृतदेह मिळाल्याची माहिती गावात पसरताच ग्रामस्थ संतप्त झाले. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. व जमाव जमला. जमाव आक्रमक होत या प्रकरणातून गावातील एका कुटुंबावर संशय व्यक्त करत त्यांच्या घराबाहेरील चारचाकी वाहनाची तोडफोड केली. जमावाच्या या आक्रमकतेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची गंभीरता ओळखून पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, हवालदार वासुदेव मराठे, सुनील पाटील आणि अमित तडवी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. साहिल चे शवविच्छेदन इन कॅमेरा पद्धतीने करण्याची मागणी साहिलच्या कुटुंबीयांनी केली असून, मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

मृतदेह सापडल्यापासून गावात संताप आणि अस्वस्थता पसरली असून, प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कता बाळगली आहे. एकंदरीत गावातील तणावाची परिस्थिती पाहता घटनेनंतर मोहराळा गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, हवालदार नीलेश चौधरी, मोहन तायडे, अल्लाउद्दीन तडवी, भरत कोळी आणि सागर कोळी यांच्यासह अतिरिक्त कर्मचारी गावात गस्त घालत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी तपासासाठी काही जणांना ताब्यात घेतले असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर अहवाल आलेवरच स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!