भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

जळगाव विधानपरिषद निवडणुकीत चौरंगी लढत; रेश्मा काळे, अनिल चौधरी मैदानात कायम, राजकीय समीकरणांना वेग

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत अर्ज माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाले असून आता निवडणूक थेट चौरंगी लढतीत रंगणार आहे. विशेष म्हणजे, शिवसेना (शिंदे गट) समर्थित मानल्या जाणाऱ्या रेश्मा कुंदन काळे यांनी अर्ज कायम ठेवल्याने राजकीय गणितांना नवे वळण मिळाले आहे.

अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी अनेक इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली. शिवसेना (शिंदे गट)चे दीपक धांडे यांनीही आपला अर्ज परत घेतला. मात्र रेश्मा काळे यांनी माघार न घेतल्याने निवडणुकीतील उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यामुळे आता त्यांची भूमिका आणि त्यांना मिळणारा संभाव्य राजकीय पाठिंबा हा चर्चेचा विषय ठरला आहे.

या निवडणुकीत सुरुवातीपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला होता. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी सर्वप्रथम उमेदवारीची घोषणा करून वातावरण निर्मिती केली. त्यानंतर महाविकास आघाडीकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने नंदकिशोर महाजन यांना अधिकृत उमेदवार घोषित केल्याने सामना अधिक रंगतदार झाला.

सुरुवातीला एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर बहुतांश उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आता अंतिम रिंगणात केवळ चार उमेदवार उरले आहेत.

अंतिम रिंगणातील उमेदवार
• नंदकिशोर महाजन – भाजप व महायुती
• शरद तायडे – महाविकास आघाडी
• अनिल चौधरी – अपक्ष
• रेश्मा कुंदन काळे – अपक्ष

रेश्मा काळे यांच्या उमेदवारी अर्जावेळी शिवसेना (शिंदे गट)च्या महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी-कोल्हे उपस्थित होत्या. त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. अखेर त्यानुसार अर्ज मागे न घेतल्याने आता शिवसेना शिंदे गटाची भूमिका काय राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांच्या मतांचे गणित, संभाव्य क्रॉस व्होटिंग आणि अपक्ष उमेदवारांचा प्रभाव यामुळे ही निवडणूक केवळ औपचारिक न राहता प्रतिष्ठेची लढत ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे जळगाव विधानपरिषद निवडणुकीत पुढील काही दिवस राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!