वाघोदा बु. येथे मोटार पंप चोरीचा सावदा पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला अटक, चारही पंप जप्त
सावदा. ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज | सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोदा बु. येथे शेतातील पाण्याचे मोटार पंप चोरी करणाऱ्या आरोपीला सावदा पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करून चोरीस गेलेले चारही मोटार पंप जप्त केले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दि. 31 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 दरम्यान रावेर तालुक्यातील वाघोदा बु. येथील चार शेतकऱ्यांच्या शेतातून एकूण 13 हजार 500 रुपयांचे चार मोटार पंप चोरीला गेले होते. यामध्ये परशुराम अशोक भोसले यांचा 4,500 रुपयांचा 1 HP मोटार पंप, सुभाष आनंद पाचील यांचा 2,000 रुपयांचा अर्धा HP टेक्समो कंपनीचा मोटार पंप, शेख चाँद शेख नबी यांचा 3,000 रुपयांचा 1 HP टेक्समो कंपनीचा मोटार पंप तसेच असगर खान अताउल्लाह खान यांचा 4,000 रुपयांचा अर्धा HP टेक्समो कंपनीचा मोटार पंप असा मुद्देमाल चोरीला गेला होता.
याप्रकरणी परशुराम अशोक भोसले यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 195/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सरफराज रहीम तडवी (वय 25, रा. वाघोदा बु., ता. रावेर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पंचांसमक्ष त्याच्या घराची झडती घेतली असता चोरीस गेलेले चारही मोटार पंप त्याच्या घरातून जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, सहायक फौजदार विनोद पाटील, पोहेकॉ विनोद तडवी, पोना सुनील सैदाणे, पोको रवी महाजन, मनोज तडवी व पोका चालक कापडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


