मुक्ताईनगरात “खाकी” चा आशीर्वाद की तोतयांचा खेळ? “अवैध गुटखा लूट” खळबळजनक चर्चेला उधाण!
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी कागदावरच असल्याचे चित्र मुक्ताईनगर शहरात उघड झाले आहे. मात्र, आता या अवैध धंद्याला एका वेगळ्याच गुन्हेगारीचे आणि भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याची धक्कादायक चर्चा शहरात रंगली आहे. बुऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभूमीजवळ दि. १६ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या ‘विमल गुटखा लूट’ प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण मिळाले असून, यामागे काही राजकीय वरदहस्त आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा संशय बळावला आहे.
उघड उघडं ‘तोडीपाणी’; तोतया पोलिसांचा सुळसुळाट!
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कारमधून नेण्यात येत असलेला अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांचा अवैध विमल गुटखा काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी मिळून लुटला असल्याची चर्चा आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे, हे कृत्य करताना काही राजकीय कार्यकर्त्यांनी चक्क एक ते दोन पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, स्वतः ‘तोतया पोलीस’ बनून भररस्त्यात नागरिकांसमोरच वाहने अडवली आणि उघड उघड ‘तोडीपाणी’ (वसुली) केली असल्याचे कळते!
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कराप्रत्यक्षदर्शींचा खळबळजनक दावा:
या संपूर्ण काळ्या कारभारात वापरण्यात आलेली चारचाकी वाहन एका होमगार्डची असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. त्यामुळे पोलीस दलातीलच काही घटक या गुन्हेगारांना फितूर झाले आहेत का? असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.पोलीस प्रशासन की राजकीय कटपुतली?
३ ते ४ लाखांचा गुटखा परस्पर विकून रक्कम लाटली गेल्याचा आरोप नागरिक करत आहेत. एवढा मोठा राडा होऊन, लाखो रुपयांची लूट होऊनही आणि शहरांत सर्वत्र चर्चा रंगलेली असतांना अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासन नेमके या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातातील ‘कटपुतली’ बनून कारभार करत आहे का? अशी संतप्त चर्चा आता चौकाचौकात रंगू लागली आहे.
जनतेचे सवाल: भविष्यात सर्वसामान्यांचे काय?
या प्रकरणामुळे मुक्ताईनगरात एका नव्या आणि अत्यंत घातक गुन्हेगारीची नांदी तर होत नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जर राजकीय पदाधिकारी आणि पोलीस मिळून असे प्रकार करणार असतील, तर सामान्य जनतेने न्याय मागावा कोणाकडे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
त्यात…
१) महाराष्ट्र राज्यात बंदी असताना मुक्ताईनगरात राजरोसपणे लाखो रुपयांचा विमल गुटखा येतोच कसा? या गुटख्याच्या सुळसुळाटामागे नेमका कोणाचा वरदहस्त आहे?
२) तोतया पोलीस बनून वसुली करणाऱ्या या राजकीय पुढाऱ्यांवर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवणार का?
३)भविष्यात अशी गुन्हेगारी वाढल्यास सर्वसामान्यांना याचा त्रास होणार नाही का? उद्या हेच तोतया पोलीस सामान्य नागरिकांना लुटणार नाहीत कशावरून?
४)या संपूर्ण गुन्हेगारीला आणि खाकीच्या बदनामीला जबाबदार कोण? संबंधित पोलीस अधिकारी की या गुन्हेगारीला पाठीशी घालणारे राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी?निष्पक्ष चौकशी झाल्यास अनेक ‘बडे मासे’ गळाला लावणार का?
या प्रकरणाची जर वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली, तर मुक्ताईनगरातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचे पदाधिकारी आणि पोलीस दलातील भ्रष्ट कर्मचारी यांचे चेहरे जनतेसमोर उघडे पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या खळबळजनक प्रकरणाबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, नेहमीप्रमाणे वृत्त लिहीपर्यंत त्यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. पोलिसांची ही ‘शांतता’ बरेच काही सांगून जाणारी आहे, एवढे मात्र नक्की खरे !

