साहेबांकरिता १० हजार व स्वतः करिता ५ हजार, जळगाव भूमी अभिलेख चा भूकरमापक १५ हजारांची लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगावच्या भूमी अभिलेख कार्यालयात वडिलोपार्जित घराचा उतारा देण्यासाठी ‘साहेबांसाठी’ १० हजार आणि स्वतःसाठी ५ हजार अशा एकूण १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जितेंद्र पाटील या भूकरमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे.
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे घराचा उतारा नोंदविण्याचे आदेश झाले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी करून उतारा अद्ययावत करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. वारंवार हेलपाटे मारूनही काम न झाल्याने चौकशी केली असता, भूकरमापक जितेंद्र पाटील यांनी ‘साहेबांसाठी’ १० हजार रुपये व स्वतःसाठी ५ हजार रुपये, अशी १५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. पडताळणीनंतर एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून जितेंद्र पाटील यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.
सविस्तर माहिती अशी की, मुळ तक्रारदार यांचे जळगाव शहरात वडिलोपार्जित घर असुन नमुद घराचे कागदपत्रांमध्ये तकारदार यांचे काकांनी फेरफार करून नमुद घर हे स्वतःच्या नावे करून तक्रारदार यांचे वडीलांचे नाव कमी केले होते. त्याबाबत जिल्हा अधीक्षक, भुमि अभिलेख कार्यालय, जळगाव येथे अपिल केले असता सदर अपिलावर नमुद नोंद रद्द होवुन तकारदार यांचे वडीलांचे नाव पुन्हा सदर घराचे उता-यावर लावणे बाबत दुरूस्ती करणेकरीता आदेश झालेले आहेत म्हणून तक्रारदार यांनी दि. २५/१२/२०२५ व दि.०५/०६/२०२६ रोजी जिल्हा अधीक्षक, भुमि अभिलेख कार्यालय, जळगाव येथे झालेल्या आदेशाप्रमाणे सदरची रद्द झालेली नोंद ७/१२ उता-यावर अदयावत करून मिळणेबाबत विनंती अर्ज केलेले होते. परंतु त्यावर अदयाप कोणतीही कारवाई झालेली नाही. म्हणुन तक्रारदार दि.१८/०६/२०२६ रोजी संबंधीत कार्यालयात जावुन त्यांचे कामाबाबत चौकशी केली असता, तेथे तकारदार यांना श्री. जितेंद्र प्रकाश पाटील, भुकरमापक यांनी सांगितले की, तुमचे काम मी साहेबांशी बोलुन करून देईल. परंतु त्यासाठी तुम्हाला आमचे साहेबांसाठी माझेकडे १०,०००/- रूपये दयावे लागतील व मला तुमचे ईच्छेप्रमाणे पैसे देवुन टाकाल असे सांगून १०,०००/- रूपये लाचेची मागणी केली होती. म्हणुन दि. २५/०६/२०२६ रोजी तक्रारदार यानी जितेंद्र पाटील यांचेविरूध्द ला.प्र.वि. जळगाव यांचेकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या लाचमागणी पडताळणी केली असता, जितेंद्र प्रकाश पाटील, भुकरमापक यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित काम करून देण्यासाठी त्यांचे साहेबांकरीता १०,०००/- रूपये व स्वतः करीता ५,०००/- लाचेची मागणी करून ती स्विकारण्यास पंचासमक्ष समंती दर्शविली होती.
तसेच आज रोजी आयोजित केलेल्या यशस्वी सापळा कारवाईदरम्यान जितेंद्र प्रकाश पाटील, भुकरमापक, जिल्हा अधीक्षक, भुमि अभिलेख, जळगाव यांनी तक्रारदार यांचेकडुन १५,०००/-रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्या नुसार जितेंद्र प्रकाश पाटील, वय-४५ वर्षे, व्यवसाय भुकरमापक, जिल्हा अधीक्षक, भुमि अभिलेख, जळगाव रा. प्लॉट नं १०२/९ब, भुषण कॉलनी, जळगाव. यांचे विरूध्द जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.
सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी- श्री. योगेश ठाकुर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि., जळगांव. सापळा अधिकारी श्रीमती रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार, कॅम्प-जळगांव. सापळा पथक श्री. हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, श्रे. पोउप निरी. सुरेश पाटील, मपोहेकों/संगिता पवार, पोकों/राकेश दुसाने, पोकों/प्रदिप पोळ, पोकों / मनोज पाटील यांनी यशस्वी केली..
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

