स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलिसांची संयुक्त कारवाई: चोरीच्या ३ महागड्या दुचाकी हस्तगत, २ आरोपीना अटक
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB), जळगाव व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने गुन्हेगारांचा शोध घेत असताना ३ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून, या प्रकरणात दोन संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत.
दिनांक ०६/०४/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अंमलदार शहरात पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इराणी मोहल्ला भागातील रजा टॉवर परिसरात काही संशयास्पद दुचाकी उभ्या आहेत. पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन खातरजमा केली असता, तेथे तीन महागड्या दुचाकी आढळून आल्या. या गाड्यांच्या मालकांबाबत शोध घेतला असता कोणीही समोर आले नाही.
सदर दुचाकी पोलीस स्टेशनला आणून त्यांचे इंजिन आणि चेसिस नंबर तपासले असता, या गाड्या मुक्ताईनगर, चोपडा आणि अहिल्यानगर (तोफखाना) येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत या गाड्या हसन अली उर्फ आशू नियाज अली इराणी आणि सलमान अली हुजूर अली इराणी (दोघे रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) यांनी चोरी करून त्या ठिकाणी लावल्याची माहिती समोर आली आहे.
जप्त केलेल्या दुचाकींचा तपशील (एकूण किंमत रु. २,१०,०००/-):
१) पल्सर १२५ (MH-19-ES-3555) किंमत
८०,०००/- मुक्ताईनगर पो.स्टे. (गु.र.नं. ९१/२०२६)
२)बजाज पल्सर N-160 (MH-19-ET-3380) किंमत ६०,०००/- चोपडा शहर पो.स्टे. (गु.र.नं. ९६/२०२६)
३)KTM Duke 250 (MH-16-DT-7433) किंमत
७०,०००/- अहिल्यानगर, तोफखाना पो.स्टे. (गु.र.नं. ११५४/२०२५)
ही यशस्वी कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), अशोक नखाते (अप्पर पोलीस अधीक्षक, जळगाव विभाग केदार बारबोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ भाग भुसावळ), यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB): वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड, पो.उप.नि. श्री. शरद बागले, श्रेणी पो.उप.नि. श्री. रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, पोना/ विकास सातदिवे, पोकों/ प्रशांत परदेशी, पोकों/राहुल वानखेडे.भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.: पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ, पोकों / योगेश माळी, पोकों / प्रशांत सोनार, पोकों / भूषण चौधरी. यांनी केली.सदर प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमार्फत केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा