भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावनशिराबादसामाजिक

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! नशिराबाद–उमाळा मार्ग सुरूच राहणार; नगरपरिषदेच्या पाठपुराव्याला यश, विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय

नशिराबाद | मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे |
विमानतळ प्राधिकरणाच्या प्रस्तावित कामांमुळे नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेला नशिराबाद–उमाळा मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शेतीच्या कामासाठी ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, नशिराबाद नगरपरिषदेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा मार्ग नियमित सुरू ठेवण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. नशिराबाद परिसरातील अनेक शेतकरी ट्रॅक्टर, बैलगाड्या तसेच इतर वाहनांद्वारे शेतीची अवजारे, शेतमाल आणि आवश्यक साहित्याची वाहतूक करण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे रस्ता बंद झाल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला असता. परिणामी शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता होती.

या पार्श्वभूमीवर नशिराबाद नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनासमोर ठामपणे मांडल्या. नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व नगरसेवक लालचंद पाटील यांनी या मार्गाचे शेतीच्या दृष्टीने असलेले महत्त्व स्पष्ट केले. हा रस्ता केवळ स्थानिक वाहतुकीचा मार्ग नसून परिसरातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या वाहतुकीवर परिणाम होऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून नशिराबाद–उमाळा मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवण्याची मागणी करण्यात आली. या मागणीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांच्या दळणवळणाची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेत मार्ग नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नशिराबाद–चिंचोली–उमाळा रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या नशिराबाद–चिंचोली–उमाळा रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांच्या दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम होणार असून, नशिराबादच्या विकासालाही चालना मिळणार आहे. शहराच्या विकासासाठी आणि विविध मूलभूत सुविधांच्या कामांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कारही करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत दादा सोनवणे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेवक लालचंद पाटील, सभापती विकास पाटील, कीर्तिकांत चौबे, चेतन बऱ्हाटे, मनोज पाटील, नगरसेविका शैला व्यवहारे, नगरसेवक अस्लम सर, इक्बाल शेख, सलीम शहा, प्रदीप बोढरे, संदीप पाटील, समाजसेवक विकास धनगर, फिरदोस यांच्यासह विमानतळ प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!