मोठा दिलासा! आता शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटपावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे रद्द, महसूल विभागाची अधिसूचना जारी
मुंबई, मंडे टु मंडे न्यूज | राज्य शासनाने शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सहधारक तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या शेतजमिनीच्या वाटपाच्या संलेखांवरील नोंदणी शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले असून, महसूल विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
नोंदणी अधिनियम, १९०८ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत हा निर्णय लागू करण्यात आला आहे. यामुळे कौटुंबिक शेतजमिनीच्या वाटपाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी होणार असून, शेतकरी कुटुंबांवरील अतिरिक्त खर्चाचा भार कमी होणार आहे.
पूर्वी २०० रुपये शुल्क आकारले जात होते
यापूर्वी कुटुंबातील सदस्यांमध्ये शेतजमिनीच्या वाटपाच्या संलेखावर (बक्षीसपत्र) २०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जात होते. हा निर्णय २०१६ मध्ये लागू करण्यात आला होता. आता हे शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आल्याने विशेषतः गरीब व लहान शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


