रावेर मध्ये गणपती विसर्जन मार्गावर किरकोळ दगडफेक; काही काळ तणाव
घरगुती गणपती विसर्जनासाठी नेत असताना रिक्षा अडवल्याचा आरोप; चार महिला जखमी, १५ ते २० जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह दंगलीचा गुन्हा
रावेर.मंडे टु मंडे न्युज. भोर. प्रतिनिधी || शहरात रविवारी घरगुती गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घरगुती गणपतीची मूर्ती रिक्षातून विसर्जनासाठी नेत असताना काही व्यक्तींनी रिक्षा अडवून पुढे जाण्यास विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर काही सेकंद किरकोळ दगडफेक झाल्याची माहिती समोर आली.
या घटनेत चार महिलांना दुखापत होऊन त्या जखमी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी आंबेडकरनगर परिसरातील रहिवासी लताबाई ईश्वर घेटे (वय ३५) यांनी रावेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून १५ ते २० जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींचा शोध घेऊन अटकेची कारवाई पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर संबंधित घरगुती गणपतीचे विसर्जन शांततेत पार पडले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी रावेर पोलीस ठाण्यात दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. घटनेमागील कारणे तसेच संबंधित व्यक्तींची माहिती पोलिसांकडून तपासण्यात येत आहे. संशयितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
रावेर शहरात शांतता
घटनेनंतर रावेर शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून सध्या शांतता आहे. आगामी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून वाढीव बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवा अथवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर खात्री न झालेली माहिती, फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असे आवाहन रावेर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, एपीआय अमोल बच्छाव आणि पीएसआय मनोज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

