अल्पवयीन मुलीचा विनयभंग व इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून बदनामी
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी सागर किरण पाटील (वय २२, रा. कुसुंबा, जळगाव) या तरुणाविरोधात भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही भुसावळ शहरातील रहिवाशी असून पीडित मुलगी आणि संशयित सागर पाटील यांच्यात जानेवारी २०२३ पासून ओळख होती. पुढे त्यांच्यात मैत्री झाली. मात्र, मैत्रीचा गैरफायदा घेत सागरने मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही
जानेवारी २०२५ मध्ये मुलीकडे लग्न व शारीरिक संबंधांची मागणी केली. पीडितेने त्यास नकार दिल्यानंतर सागरने तिचा मानसिक छळ सुरू केला.
ती क्लासला जाताना व घराबाहेर पडल्यावर सागर तिचा सार्वजनिक ठिकाणीही सतत पाठलाग करून तिच्या मनात भीती आणि लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करत होता. इतकेच नव्हे तर सागरने पीडितेच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून त्यावर तिचे व स्वतःचे फोटो पोस्ट करत बदनामी केली. या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास कुटुंबाला इजा पोहोचवण्याची धमकी दिली. शेवटी या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात सागर किरण पाटील (वय २२, रा. कुसुंबा, जळगाव) याचे विरोधात पीडित तरुणीने केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पो.नि. उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनात एपीआय राहुल भंडारे करत आहेत.

