शालेय विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी नशिराबाद पोलिसांकडून जनजागृती
नशिराबाद.मंडे टु मंडे न्युज.डॉ.दीपक लोखंडे | येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय विद्यार्थी सुरक्षा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नशिराबाद पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.
नशिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांनी विद्यार्थ्यांना जळगाव पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘राईज’ उपक्रमाची माहिती दिली. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तींबाबत किंवा अमली पदार्थांची हाताळणी करणाऱ्यांविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलीस स्टेशनला देण्याचे आवाहन त्यांनी केले. अमली पदार्थांच्या आहारी जाण्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, शारीरिक व सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणामही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी अथवा मदतीची आवश्यकता भासल्यास ‘११२’ या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा या विषयावरही विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क, संशयास्पद लिंक तसेच वैयक्तिक माहिती शेअर न करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस कर्मचारी युगंधरा नारखेडे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत ‘गुड टच-बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन केले. अनोळखी किंवा परिचित व्यक्तीकडून अनुचित स्पर्श झाल्यास घाबरून न जाता विश्वासू पालक, शिक्षक किंवा संबंधित व्यक्तींना त्याबाबत माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास पोलीस कर्मचारी विशाखा कोकरे, रामकृष्ण माळी यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका एस. ए. बनसोडे, उपमुख्याध्यापक अनिल चौधरी, पर्यवेक्षक एस. एन. पाचपांडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. के. जोशी यांनी केले. विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत विविध विषयांबाबत प्रश्न विचारले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविरोधात जागरूकता निर्माण करण्याबरोबरच सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षिततेबाबतही महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
