नवयुवक गणेश मंडळ, आमोदेचा सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सव उत्साहात,५० व्या वर्षानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम ; गणरायाला निरोप
आमोदे, ता.यावल. मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यातील आमोदे येथील नवयुवक गणेश मंडळाने यंदा गणेशोत्सवाचे ५० वे वर्ष मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरे केले. सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपत गावातील नागरिक, युवक व गणेशभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.
गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंडळाने केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर सामाजिक कार्याची परंपरा जपली आहे. त्यामुळे नवयुवक गणेश मंडळाला गावातील सामाजिक उपक्रमांमध्ये विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त गणरायाची भव्य-दिव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक सजावट, ढोल-ताशांचा गजर, गुलाल उधळत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संपूर्ण आमोदे गाव भक्तिमय झाले होते. मिरवणुकीत मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नवयुवक गणेश मंडळाच्या ५० वर्षांच्या वाटचालीत सामाजिक एकोपा, युवकांचा सहभाग आणि समाजसेवेची भावना जपण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात आला असून, यापुढेही विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.
मंडळाचे कार्यकर्ते सागर पाटील, योगेश चौधरी, चेतन चौधरी, तेजस पाटील, पवन पाटील, किरण पाटील, मयूर पाटील, कुणाल पाटील, हेमंत पाटील, कुमार पाटील, सौरभ महाजन, निलेश पाटील, हर्षल भोगे, पुष्पक सरोदे,यश पाटील यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.


