भुसावळ एमआयडीसीत भीषण आग; दोन गायींचा होरपडून मृत्यू,जळगावसह भुसावळ, वरणगाव,दीपनगर अग्निशमन दलांना तातडीने पाचारण
भुसावळ.मंडे टु मंडे न्युज | भुसावळ एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्रमांक डी-६७ येथील एन.आर.जे. फर्मा कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच जळगावसह भुसावळ, वरणगाव आणि दीपनगर येथील अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. विविध अग्निशमन दलांच्या संयुक्त प्रयत्नांतून अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्घटनेत दोन गायींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पोलिस कंट्रोल रूमकडून रात्री १२ वाजून ५४ मिनिटांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचले असता कंपनी परिसरात आग मोठ्या प्रमाणात भडकलेली होती. आगीची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने अतिरिक्त अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले.
आग विझविण्यासाठी जळगाव अग्निशमन दल, भुसावळ नगरपरिषद, वरणगाव नगरपरिषद, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र तसेच वरणगाव फॅक्टरीच्या अग्निशमन बंबांनी संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न केले. विविध ठिकाणांहून दाखल झालेल्या अग्निशमन पथकांनी अथक प्रयत्न करत आग अधिक पसरू न देता अखेर नियंत्रणात आणली.
दरम्यान, घटनास्थळी दोन गायी मृतावस्थेत आढळून आल्या. त्यामुळे आगीच्या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले.
या अग्निशमन कार्यवाहीत वा.चा. प्रदीप धनगर तसेच फायरमन सौरभ चिकटे, विठ्ठल पाटील, अहत्तेशाम शेख, सुमित सावळे आणि यश मनोरे यांनी सहभाग घेतला. त्यांच्या तत्पर कार्यवाहीमुळे आग परिसरात अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून याबाबत तपासणी सुरू असून, आगीत कंपनीचे किती नुकसान झाले याचा नेमका तपशील तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

