भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगावनशिराबादसामाजिक

मृत्यूनंतरही जगता येते ; नशिराबाद मध्ये अवयवदानाचा महासंकल्प ‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जनजागृतीचा संदेश

नशिराबाद,मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | “मृत्यूनंतरही आपले डोळे कोणाला तरी दृष्टी देऊ शकतात, हृदय एखाद्याच्या शरीरात धडकू शकते. अवयवदान हे केवळ दान नसून, एका विझणाऱ्या आयुष्याला दिलेले जीवनदान आहे,” असा भावनिक व प्रबोधनात्मक संदेश देत प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबादच्या वतीने गुरुवारी गावात अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जागतिक अवयवदान दिनानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते व डॉ. अमन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित मोठे बळ दिले.

घोषणांनी दुमदुमला परिसर

हातात माहितीपत्रके, आकर्षक पोस्टर्स घेऊन नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी “अवयवदान—श्रेष्ठ दान”, “चला, अवयवदानाचा संकल्प करूया, मानवतेचे ऋण फेडूया” अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत विद्यार्थ्यांनी अवयवदानाबाबत असलेल्या गैरसमज, अंधश्रद्धा व भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

रॅलीच्या सांगता सभेत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते व डॉ. अमन पटेल यांनी अवयवदानाबाबत शास्त्रीय माहिती दिली. एका ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. देशात अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असून, ग्रामीण भागातूनही अवयवदानाच्या चळवळीला व्यापक प्रतिसाद मिळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य यंत्रणेचे चोख नियोजन

या संवेदनशील व महत्त्वपूर्ण जनजागृती उपक्रमासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रम घेतले. रॅलीचे शिस्तबद्ध संचलन आरोग्य सेवक दीपक तायडे, सुनील ढाके, संदेश महाजन व वासुदेव पाटील यांनी केले. तांत्रिक बाजू प्रयोगशाळा तंत्रज्ञ नीलिमा येलगिरे व विजय सपकाळे यांनी सांभाळली.

रॅलीदरम्यान वाहतूक व व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी १०२ रुग्णवाहिका चालक राजाराम पाचपांडे तसेच १०८ रुग्णवाहिका चालक जीवन शिरसाठ व बापू मराठे यांनी मोलाचे योगदान दिले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या प्रभावी जनजागृती उपक्रमाचे लोकप्रतिनिधींसह परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!