फैजपूर मध्ये १०० गॅस सिलेंडर चोरट्यांनी केले लंपास
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फैजपूर शहरातील भुसावळ रोडवरील पिंपरुड फाटा परिसरातील श्रीधर गॅस एजन्सीच्या गोदामातून तब्बल शंभर भरलेले गॅस सिलिंडर लांबवल्याची घटना चोरट्यांनी २५ एप्रिलच्या म ध्यरात्री घडली. शनिवारी पहाटे हा सर्व प्रकार उघडकीस आला. या चोरीने या परिसरात मोठी खळबळ उडाली असून सीसीटीव्ही व तांत्रिक आधारावर चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
पिंपरुड शिवारात फैजपूर येथील ललित रघुनाथ राणे यांच्या मालकीचे भारत गॅसचे अधिकृत गोदाम आहे. २५ रोजी सायंकाळी एजन्सीचे कर्मचारी आणि संचालकांनी गोदाम नेहमीप्रमाणे बंद केले होते. त्यावेळी गोदामात १४२ किलो वजनाचे २०९ भरलेले सिलिंडर होते. शनिवारी सकाळी कर्मचारी गोदाम उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना मुख्य गेटचे कुलूप तुटलेले दिसून आले. यावेळी गोदाम मालकांनी पाहणी केली. यावेळी त्यांना १०० सिलिंडर चोरीला गेल्याचे आढळून आले. एका सिलिंडरची किंमत ३ हजार ११८ रुपये असून, चोरट्यांनी ३ लाख ११ हजार ८०० रुपयांचे सिलिंडर लांबवले. चोरट्यांनी मोठ्या वाहनाचा वापर केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सध्या आखाती देशांमधील तणावामुळे भारतासह जगभरात गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. देशात गॅस टंचाईचे सावट असून नागरिकांना एका सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा संकटकाळात फैजपूरमधील श्रीधर गॅस एजन्सीच्या गोदामातून चोरट्यांनी चक्क १०० भरलेले सिलिंडर चोरून नेल्याने ग्राहकांची गैरसोय होण्याची भीती आहे. या प्रकरणी ललित राणे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

