सावदा प्रभाग ७ मध्ये महिला शक्तीचा गटनेता रंजनाताई भारंबेंसह घरोघरी ‘आशीर्वादाचा दिवा’!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रसेवेला नमन; विकसित भारतासाठी प्रार्थना
सावदा, मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क | सेवेला साधना मानणाऱ्या नेतृत्वाच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी सावदा शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये ‘आशीर्वादाचा दिवा’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हा उपक्रम उत्साहात पार पडला.
प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका तथा शिवसेना-भाजप युतीच्या गटनेता रंजनाताई जितेंद्र (जे.के.) भारंबे यांच्या पुढाकाराने महिला शक्ती व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अविरत राष्ट्रसेवेला नमन करत त्यांच्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. एक दीप… सशक्त नारीशक्तीच्या सन्मान व विकसित भारताच्या संकल्पाचा एक दिप घरोघरी प्रज्वलित करण्यात आला.
जनसेवा हीच साधना मानून देशाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकासाच्या दिशेने वाटचाल करावी, महाराष्ट्राची प्रगती अधिक वेगाने व्हावी, जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदावे आणि देशाचे भविष्य अधिक उज्ज्वल व्हावे, यासाठी आई भवानीच्या चरणी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.
या उपक्रमाच्या निमित्ताने प्रभागातील महिलांनी एकत्र येत ‘सेवेचा संकल्प, विकासाची वाटचाल आणि विकसित भारताचे स्वप्न’ याला आपला पाठिंबा व्यक्त केला. घरोघरी आशिर्वादाचा एक दिवा प्रज्वलित करण्यात आला. परिसरात सकारात्मक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
याप्रसंगी गटनेता तथा नगरसेविका रंजना ताई जितेंद्र (जे.के.) भारंबे यांच्यासह प्रभाग क्रमांक ७ मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
‘आशीर्वादाचा दिवा’ केवळ एका वाढदिवसाच्या शुभेच्छांचा उपक्रम न राहता, राष्ट्रसेवेच्या संकल्पाला उजाळा देणारा आणि विकसित भारताच्या स्वप्नासाठी प्रार्थना करणारा उपक्रम ठरला.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

