भुसावळ रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर खाली पडलेले वडे विक्री, विक्रेत्याला अटक, स्टॉल सील,परवाना रद्द
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क| भुसावळ रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर खाली पडलेले वडे पुन्हा उचलून प्रवाशांना विकल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या किळसवाण्या प्रकाराची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाई केली असून, संबंधित विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याचा स्टॉल सील करून ठेकेदाराचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
भुसावळ रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर खाली पडलेले वडे पुन्हा उचलून ते प्रवाशांना पुन्हा विकलेल्या प्रकार समोर आला. असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या भुसावळ रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत ‘त्या’ निर्लज्ज विक्रेत्याला तात्काळ अटक करत कायद्याचा बडगा उगारला.
प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या वडा विक्रेत्याचा शोध घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. सीसीटीव्हीच्या आधारे त्या विक्रेत्याची ओळख पटवून त्याला तात्काळ अटक करण्यात आली. पुढील कडक कायदेशीर कारवाईसाठी त्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) ताब्यात देण्यात आले असून, रेल्वे कायद्याच्या विविध कलमांनुसार सध्या त्याची सविस्तर चौकशी सुरू आहे.
रेल्वे प्रशासनाने या घटनेनंतर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोठी कारवाई केली आहे. संबंधित खाद्यपदार्थांचा स्टॉल बंद (सील) करण्यात आला असून ठेकेदाराचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

