भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

कत्तलीसाठी नेले जाणारे दोन गोवंश सावदा पोलिसांनी केले मुक्त; एकास अटक, १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

सावदा | मंडे टु मंडे न्यूज | सावदा शहरातील ख्वाजा नगर परिसरात कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या दोन गोवंशांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर सावदा पोलिसांनी धडक कारवाई करत चालकाला अटक केली. या कारवाईत दोन गोवंशांसह टाटा मॅजिक पिकअप वाहन असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांना गोपनीय माहिती मिळाली की, ख्वाजा नगरच्या दिशेने MH-02-YA-2644 क्रमांकाच्या टाटा मॅजिक पिकअपमधून गोवंशांची कत्तलीच्या उद्देशाने अवैध वाहतूक केली जात आहे. त्यानुसार रात्रगस्त पथक व गोपनीय शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वृंदावन मॉलसमोरील रस्त्यावर सापळा रचला.

सकाळी सुमारे ६ वाजता संशयित वाहन अडवून तपासणी केली असता वाहनाच्या मागील भागात दोन गो-हे (गोवंश) अतिशय अमानुष पद्धतीने दोरीने बांधून कोंबलेले आढळले. त्यांना हालचाल करण्यास पुरेशी जागा नसून त्यांच्या शरीरावर खरचटल्याच्या जखमा दिसून आल्या.
वाहन चालकाने आपले नाव शेख तनवीर शेख खलील (वय २७, रा. ख्वाजा नगर, सावदा, ता. रावेर) असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याने हे गोवंश मारुळ (ता. यावल) येथून आणले असून कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली. तसेच गोवंश खरेदी-विक्रीची कागदपत्रे, वाहतुकीचा परवाना, वाहनाची आवश्यक कागदपत्रे किंवा अन्य वैध परवाने त्याच्याकडे नसल्याचेही स्पष्ट झाले.

यानंतर वाहन व गोवंश सावदा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या दोन गोवंशांची किंमत ४० हजार रुपये, तर टाटा मॅजिक वाहनाची किंमत १ लाख रुपये असल्याने एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही गोवंशांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी गोशाळेत पाठविण्यात आले आहे.

या प्रकरणी पोकाँ. बबन दगडू तडवी यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १९४/२०२६ दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच मोटार वाहन अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. उमेश पाटील, पोहेकॉ. समीर तडवी, पोना. सुनिल सैंदाणे, पोकाँ. मयूर पाटील, पोकाँ. बबन तडवी, पोकाँ. राहुल येवले व पोकाँ. विकास जोशी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!