शालार्थ आयडी घोटाळा : खटला सत्र न्यायालयात वर्ग; संशयितांना २९ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश, आणखी नावे खुलासे होण्याची शक्यता
बनावट ८४१ शिक्षकां पैकी ६३८ शिक्षक जळगाव जिल्ह्यातील
नाशिक.मंडे टु मंडे न्युज | तब्बल १६० कोटी रुपयांच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या तपासाला आता आणखी वेग आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता नाशिकरोड अतिरिक्त न्यायालयाने खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग केला आहे. तसेच, प्रकरणातील अटक केलेल्या सर्व संशयितांना २९ ऑगस्ट रोजी सत्र न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या घोटाळ्यात नाशिक विभागातील तब्बल ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील ६३८ कर्मचारी एकट्या जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात आतापर्यंत १,१९९ संशयितांची नावे समोर आली आहेत.
या प्रकरणातील तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह १४ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज नाशिकरोड अतिरिक्त न्यायालयाने यापूर्वी फेटाळले आहेत. जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने शिक्षण क्षेत्रातील गुन्हेगारी कृत्यांबाबत गंभीर निरीक्षण नोंदवले होते.
सात प्रमुख संशयितांना अटक
मार्च २०२६ मध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणातील प्रमुख संशयितांवर कारवाई केली. आतापर्यंत सात प्रमुख संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये नितीन उपासनी, शशिकांत हिंगोणेकर, संजय गरूड, दीपक गरूड, प्रशांत वाडीले, किरण पाटील आणि राहुल पवार यांचा समावेश आहे. या कारवाईनंतर प्रकरणातील इतर अधिकारी, कर्मचारी आणि मध्यस्थांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली असून, अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धावाधाव सुरू असल्याचे समोर आले आहे.
नितीन उपासनींवर रुग्णालयात उपचार
माजी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांना वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार हृदयाशी संबंधित उपचारासाठी संदर्भ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या सुनावणीस ते अनुपस्थित होते.
दरम्यान, संशयित किरण पाटील यांना प्रत्यक्ष न्यायालयात, तर राहुल पवार यांना मध्यवर्ती कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.आता २९ ऑगस्ट रोजी सत्र न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण प्रकरणाचे लक्ष लागले असून, पुढील न्यायालयीन कारवाईत आणखी कोणते खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

