Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावभडगाव

धक्कादायक घटना ; ८०० रुपायांचा वाद, मामे भावाची दगडाने हत्या : मृताच्या तोंडातील दात दगडाने तोडून ठेवले बॅगेत

जळगाव,मंडे टु मंडे न्युज | भडगाव तालुक्यातील नगरदेवळा स्टेशनजवळ अवघ्या ८०० रुपयांच्या पैशांवरून झालेल्या वादातून पारधी समाजातील एका व्यक्तीने आपल्या मामे भावाची दगडाने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मा जुगा पवार (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, जुगा कांतिलाल पवार (वय ३०) याला या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही गावोगावी जाऊन रुद्राक्ष विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धर्मा पवार याने काल सुमारे ८०० रुपयांचे रुद्राक्ष विकले होते. त्यानंतर दोघे नगरदेवळा स्टेशन परिसरातील एका ठिकाणी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास दारू प्यायला बसले. याचदरम्यान रुद्राक्ष विक्रीतून मिळालेल्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी जुगा पवार याने धर्मा पवार याच्यावर दगडाने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या हल्ल्यात धर्मा पवार याचा मृत्यू झाला.

दरम्यान, आरोपीच्या जवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये मृत धर्मा पवार याचे दात आढळून आल्याने पोलिसांनाही धक्का बसला. आरोपीने मृताच्या तोंडातील दात दगडाने तोडून ते बॅगेत ठेवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याच बॅगेत दोन जिवंत कबुतरेही आढळून आली. ही कबुतरे खाण्यासाठी आणली असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात शोधमोहीम सुरू असताना शेताजवळ काही कुत्रे भुंकत असल्याचा आवाज पोलिसांच्या कानावर आला. त्या दिशेने पोलिस गेले असता, शेतात आरोपी जुगा पवार हा दारूच्या नशेत बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी जुगा कांतिलाल पवार याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. अवघ्या ८०० रुपयांच्या आर्थिक वादातून झालेल्या या हत्येच्या घटनेने नगरदेवळा परिसरात खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!