साहित्याची आवड जोपासणाऱ्या विद्यार्थिनींची लेखनविश्वात झेप; ‘द. ट्रुथ दे बरीड ’ पुस्तकाचे प्रकाशन
तारापूर/बोईसर,मंडे टु मंडे न्युज| चिन्मय विद्यालय, तारापूर यांनी ब्रि बुक्सच्या सहकार्याने विद्यार्थ्यांमधील साहित्यिक गुणांना वाव देण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित केला होता. लेखनाची आवड असलेल्या तसेच भविष्यात पुस्तक लेखन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमातून स्वतःचे पुस्तक लिहिण्याची संधी देण्यात आली.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या किंवा रस असलेल्या कोणत्याही विषयावर कादंबरी अथवा लघुकथा लिहिण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. विषय निश्चित नसल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला व साहित्यिक कौशल्याला मुक्त वाव दिला.
याच उपक्रमातून विद्यार्थिनी कु. इशिका विजय पाटील हिने “‘द. ट्रुथ दे बरीड” हे पुस्तक लिहिले आहे.
३९ पानांच्या या पुस्तकाची कथा चार चुलत भावंडांभोवती फिरते. सुट्टीसाठी एकत्र आलेल्या या भावंडांना एका पडीक आणि रहस्यमय जागेबद्दल कुतूहल निर्माण होते. ती जागा ओसाड का आहे, तेथे पूर्वी काय घडले होते, याचा शोध घेण्यासाठी ही मुले त्या ठिकाणी जातात. या शोधप्रवासादरम्यान त्यांना काय आढळते आणि त्यातून कोणते रहस्य उलगडते, यावर या पुस्तकाची कथा आधारित आहे.
विद्यार्थिनी कु इशिका विजय पाटील हिला फॉर्म्युला वन रेसिंग तसेच त्यातील ड्रायव्हर्सबद्दल विशेष आकर्षण आहे. त्यामुळे तिने आपल्या पुस्तकातील पात्रांची नावे फॉर्म्युला वनमधील प्रसिद्ध ड्रायव्हर्सच्या नावांवरून ठेवली आहेत. त्यामुळे कथेला एक वेगळेपणा लाभला आहे.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा आणि साहित्यनिर्मितीची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला असून, विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. कु .इशिका ही कै.डॉ.विजय शांताराम पाटील बोईसर यांची कन्या आहे.
