“भोंदूबाबा”चे नवनवे कारनामे, गर्भवती महिले सह अल्पवयीन मुलीलाही सोडलं नाही, अशोक खरातच्या नव्या कांडाने खळबळ
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | लिंगपिसाट अशोक खरातवर एका महिलेने बलात्कार आणि अत्याचार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता आणखी महिलेने तक्रार दाखल केली आहे. एका गर्भवती महिलेलाही सोडलं नाही. पीडित महिला गर्भवती असताना तिच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्या बाबत तिने तक्रार दाखल केली असून त्या सोबतच एका अल्पवयीन मुलीला केबलच्या सहाय्याने करंट देत अत्याचार केल्याची धक्कादायक गंभीर प्रकार समोर आला.
नाशिकच्या ‘भोंदू बाबा’ कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातविरुद्ध आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून, पीडित महिला गर्भवती असताना तिच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, ती गर्भवती असताना खरातने पूजा-अर्चना आणि विधीच्या नावाखाली तिचे लैंगिक शोषण केले. तक्रारीत स्पष्ट उल्लेख आहे की, खरातने महिलेसोबत आलेल्या तिच्या पतीला बाहेर बसवून आतमध्ये एकटे राहून अत्याचार केला. याशिवाय, पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत नमूद आहे.
गर्भवती महिलेवरही अत्याचार केल्याच्या या आरोपाने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे. खरात प्रकरण आता केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर मानसिक छळ, धमकावणे, जादूटोणा आणि अघोरी कृत्यांपर्यंत पोहोचले आहे. SIT आणि पोलीस यंत्रणा या प्रकरणात तातडीने कारवाई करत असून, लवकरच आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक शहरात अशोक खरातविरोधात आणखी एक लैंगिक शोषण व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे या प्रकरणातील पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तपास अधिक खोलवर जात असताना आणखी काही पीडिता पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचवेळी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, खरातने केबलच्या साहाय्याने करंट देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विश्वास संपादन करीत त्याने अनेकांना जाळ्यात ओढत त्यांच्यावर अमानुष कृत्ये केल्याचे उघड होत आहे.
एसआयटी (विशेष तपास पथक) प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तपासात ही नवीन तक्रार महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वी खरातच्या घर आणि कार्यालयातून ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ, ८ लाख रोख रक्कम, पिस्तूल, जीवंत काडतुसे आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त झाली आहेत. आता ही नवीन तक्रार आल्याने त्याच्या ‘पूजा विधी’ आणि ‘समस्या निवारण’च्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या संपूर्ण व्यवहारांचा सखोल तपास होण्याची शक्यता वाढली आहे.
नकली साप आणि वाघाचे कातडे
तक्रारीत आणखी एक भयानक पैलू समोर आला आहे. अशोक खरातने नकली साप आणि नकली वाघाचे कातडे वापरून लोकांना घाबरवले आणि त्यानंतर अघोरी कृत्ये केल्याचा उल्लेख आहे. या सर्व प्रकारे तो लोकांना मानसिकदृष्ट्या दबावाखाली आणून शोषण करत असल्याचे पीडितेने सांगितले आहे. या नव्या तक्रारीत खरातविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या खालील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे: BNS ६४ (१) – बलात्कार, BNS ७४ – लैंगिक अत्याचार आणि BNS ३५१ (२) – जीवे मारण्याची धमकी या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

