भुसावळ मध्ये प्रेमविवाह केल्याने नग्न करून मारहाण करत नवविवाहित तरुणाला खांबाला बांधले, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | तरुणाने तरुणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून नवविवाहित तरुणाला नग्न करून त्याला अमानुष पणे मारहाण करत त्याला नग्न अवस्थेत खांबाला बांधून मारहाण करण्यात आली तसेच तरुणाच्या पत्नीला जबरजस्तीI उचलून नेल्याची संतापजनक घटना भुसावळ शहरात घडली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली.
चेतन दिलीप जंगले (वय २५, रा. खडका. ता. भुसावळ . याने धनश्री नितीन पाटील (रा. शिरपूर कन्हाळा. ता . भुसावळ) हिच्यासोबत १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथील पंचवटी येथे प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर दोघांनी नातेवाईकांना माहिती दिली. १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिल्यानंतर ते चेतनच्या मामाच्या घरी मुक्कामी होते. त्या नंतर २० मार्च रोजी दुपारी ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास धनश्रीचे नातेवाईक मनोज पाटील, रूपाली उर्फ पूनम पाटील, तेजस पाटील, कोमल पाटील व इतर १० ते १२ जणांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्यांनी धनश्रीला पकडून मारहाण करत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने पळवून नेले.
यानंतर आरोपींनी चेतन जंगले याला घरातच बेदम मारहाण करत रुमालाने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. व त्याला बाहेर ओढत नेऊन नग्न करून खांब्याला बांधून लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. “मुलीला सोडून दे” असा जबरदस्ती कबुली जबाब घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्या नंतर आरोपींनी त्याला मोटारसायकलवरून खडका येथे त्याच्या घरापर्यंत आणत मारहाण केली. घरी येऊन त्याच्या आई-वडिलांना मारहाण व शिवीगाळ करत घर जाळून टाकण्याची धमकी दिली. परिसरातील नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करून चेतन याची सुटका केली. जखमी अवस्थेत चेतन याला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरां कडून सांगण्यात आले.
या प्रकरणी कोमल प्रकाश पाटील (२४), विजय नरोत्तम पाटील (५२), हेरंब महेश चौधरी (१९), ज्ञानेश्वर भास्कर भोई (१९) व संजय सोनू बढे (६१) या पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता २५ मार्चपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व तपासाबाबत सूचना दिल्या.
