यावल तालुका खुनाने हादरला : दोघांनी केली मित्राचीच हत्या,नेमके कारण अद्याप अस्पष्ट
फैजपूर.मंडे टु मंडे न्युज || नॉनव्हेज जेवण न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मित्राच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालोद येथे रविवारी रात्री घडली. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर दोन मित्रांनी सहकारी मजूर असलेल्या मित्राच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रमेश ईश्वरसिंग भंवर (वय 35, रा. खंडवा, मध्यप्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. तर सुरज कोळी आणि सुरज उर्फ गोलू नेमाडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
नॉनव्हेजच्या जेवणावरून वाद पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश भंवर, सुरज कोळी आणि सुरज उर्फ गोलू नेमाडे हे तिघे मित्र असून मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. तिघांनाही एकत्र बसून दारू पिण्याची सवय होती. रविवारी रात्री सुमारे 8 ते 8.30 वाजेच्या सुमारास तिघे भालोद येथे दारू पीत बसले होते.
दरम्यान, रमेशने स्वतःच्या पैशातून आणलेले मासे एका मित्राकडे बनवण्यासाठी दिले होते. नॉनव्हेजचे जेवण आपल्या वडिलांनाही द्यावे, असा आग्रह सुरज कोळी याने धरल्याने रमेश आणि सुरज यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर दोन्ही संशयितांनी रमेशच्या डोक्यात दगड घातल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या हल्ल्यात रमेशचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी मृतदेह एमएसईबीजवळील सुमारे 100 मीटर अंतरावरील एका खड्ड्यात टाकून घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची चक्रे गतिमान करीत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास फैजपूर पोलीस करीत असून, हत्येमागील नेमके कारण व घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

